Israel-Iran War Updates: इस्रायल-इराण संघर्ष दिवसेंदिवस चिघळू लागला आहे. शुक्रवारी १३ जून रोजी दोन्ही देशांमधील थेट संघर्षाला तोंड फुटलं. आधी इस्रायलनं इराणमधील लष्करी तळ व आण्विक तळांवर हवाई हल्ला चढवला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनंदेखील इस्रायलमधील ठिकाणांना लक्ष्य करून ड्रोन हल्ले केले. तेव्हापासून दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला असून आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. कच्च्या तेलाच्या किमती हा आंतरराष्ट्रीय समुदायासाठी चिंतेचा घटक ठरला आहे. इराणमधील चिघळणारी परिस्थिती पाहता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.
इस्रायल व इराणमध्ये मोठा संघर्ष सुरू झाला असून एकमेकांच्या आण्विक तळांना लक्ष्य करण्याची भाषा दोन्ही बाजूंनी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आण्विक तळ बेचिराख झाल्यास फक्त इस्रायल किंवा इराणच नव्हे, तर संपूर्ण जगाला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यासोबतच, या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती भरमसाठ वाढण्याचीही शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. कारण या युद्धामुळे थेट कच्च्या तेलाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
इराणमधील भारतीयांचं काय?
दरम्यान, आण्विक उत्सर्जन व कच्च्या तेलाच्या किमती या दोन घटकांसोबतच इराणमधील विदेशी नागरिकांचाही मुद्दा ऐरणीवर आला आहे. शुक्रवारी दोन्ही देशांमधील संघर्ष सुरू झाल्यानंतर भारतानं इराणमधील भारतीयांना सतर्क राहण्याचं व इराणमधील दूतावासाच्या संपर्कात राहण्याचं आवाहन केलं होतं. आता इराणमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसंदर्भात भारत सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.
केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात जाहीर निवेदनाद्वारे माहिती दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेलं निवेदन शेअर केलं आहे. या निवेदनावर १५ जून २०२५ अशी तारीख नमूद करण्यात आली आहे.
“तेहरानमधील (इराणची राजधानी) सुरक्षाविषयक परिस्थितीवर तेथील भारतीय दूतावास लक्ष ठेवून आहे. इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांशी दूतावासातील अधिकारी संपर्क ठेवून असून त्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जात आहे. काही प्रकरणात काही भारतीय विद्यार्थ्यांना भारतीय दूतावासाच्या देखरेखीखाली इराणमध्येच सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठीचे इतर योग्य पर्यायही तपासून पाहिले जात आहेत. यासंदर्भात निर्णय होताच पुढील माहिती पुरवली जाईल”, असं या निवेदनात म्हटलं आहे.
महत्त्वाची शहरं बेचिराख होण्याच्या उंबरठ्यावर?
इस्रायल व इराण यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचल्याचं चित्र सध्या निर्माण झालं आहे. अमेरिकेकडून सातत्याने या संघर्षात मध्यस्थी करून मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली जात आहे. मात्र, इस्रायलनं हा हल्ला अमेरिकेच्या मदतीनेच केल्याचा इराणचा अंदाज आहे. त्यामुळे अमेरिकेला या संघर्षात न पडण्याबाबत इराणमधील विविध गटांकडून इशारे देण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर हा संघर्ष नेमका कुठपर्यंत जाणार आणि कधी थांबणार? याविषयी मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे.
इराणने आत्तापर्यंत इस्रायलमदील तेल अविव, बात याम या शहरांमध्ये ड्रोन डागले असून इस्त्रायलने रविवारी दुपारी थेट इराणची राजधानी तेहरानवर जोरदार हवाई हल्ले केले. ही ठिकाणं इस्रायलपासून जवळपास २३०० किलोमीटर लांब असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे इस्रायलनं इराणमधील लांब पल्ल्यावर असणारी ठिकाणंही लक्ष्य करायला सुरुवात केल्याचं दिसून येत आहे.