Israel Shares Wrong India Map about Jammu And Kashmir : इस्रायल व इराणमध्ये संघर्ष चालू असतानाच इस्रायली लष्कराने इराणपासून जगाला धोका असल्याची एक पोस्ट समाजमाध्यमांवर केली. यामध्ये त्यांनी जगाचा नकाशा देखील शेअर केला आहे. या नकाशात त्यांनी इराणी क्षेपणास्त्रांची रेंज (आवाका) दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र यामध्ये भारतीय सीमा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा नकाशा पाहून भारतीयांनी संताप व्यक्त केला आहे. तर काहींनी, समाजमाध्यमांवर इस्रायलचा निषेध केला आहे.
इस्रायलने शेअर केलेल्या नकाशात जम्मू-काश्मीर पाकिस्तानचा भाग असल्याचं व अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचं दाखवण्यात आलं आहे. इस्रायली लष्कराने (आयडीएफ) शेअर केलेल्या या नकाशावर भारतीय युजर्सनी आक्षेप नोंदवल्यानंतर आयडीएफने माफी मागितली आहे.
नेमकं प्रकरण काय?
आयडीएफने १३ जून रोजी सकाळी एक ग्राफिकल वर्ल्ड मॅप (जागाचा नकाशा) एक्सवर शेअर केला. यामध्ये इराण कोणकोणत्या देशांवर क्षेपणास्त्र डागण्यास सक्षम आहे ते दाखवण्यात आलं होतं. म्हणजेच इराणची क्षेपणास्त्रे किती दूरपर्यंत मारा करू शकतात त्याचं चित्रण करण्यात आलं होतं. यासह आयडीएफने म्हटलं होतं की इराण हा जागतिक धोका आहे. इस्रायल हे काही त्यांचं पहिलं व अंतिम लक्ष्य नाही. ही तर केवळ सुरुवात आहे. आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्यांच्यावर कारवाई करण्याशिवाय आमच्याकडे काहीच पर्याय नव्हता.
दरम्यान, या पोस्टसह शेअर करण्यात आलेल्या नकाशात भारताच्या सीमा मात्र चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्या आहेत. ज्यामुळे वाद सुरू झाला आहे. इस्रायलची ही चूक भारतीय युजर्सच्या नजरेतून सुटली नाही. त्यांनी लगेच यावर आक्षेप नोंदवण्यास सुरुवात केली आहे. कारण यात जम्मू-काश्मीर पाकिस्तानचा हिस्सा असल्याचं, अरुणाचल प्रदेश चीनचा हिस्सा असल्याचं दाखवण्यात आलं आहे. तसेच ईशान्य भारताचा काही भाग नेपाळशी जोडला आहे. त्यामुळे भारतीयांनी यावर संताप व्यक्त केला. हा नकाशा भारताच्या सार्वभौमत्वावर व प्रादेशिक अखंडतेवर प्रश्न उपस्थित करत असल्याचं मत काही युजर्सनी नोंदवलं.
इस्रायली लष्कराने मागितली माफी
भारतीयांच्या नाराजीसमोर इस्रायल झुकला आणि त्यांनी शुक्रवारी दुपारी एक पोस्ट करून माफी मागितली आहे. आयडीएफने म्हटलं आहे की ही पोस्ट केवळ एका क्षेत्राचं चित्रण म्हणून पोस्ट करण्यात आली आहे. यात आम्ही कुठल्याही भागाचा, देशाचा नकाशा दाखवलेला नाही. तरीदेखील या पोस्टमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या असतील आम्ही त्यांची माफी मागतो.