गाझा, जेरुसलेम : हमासबरोबर सुरू असलेल्या युद्धामध्ये ‘अल्प विराम’ घेण्यास तयार असल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी सोमवारी रात्री ‘एबीसी न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत उशिरा स्पष्ट केले. हमासच्या तावडीतून ओलिसांची सुटका करण्यासाठी अल्प विराम घेण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.
गाझामधील पॅलेस्टिनींपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी युद्धविराम घ्यावा असे आवाहन केले जात आहे, पण नेतान्याहू यांनी त्यास नकार दिला होता. हमासने सर्व ओलिसांची सुटका केल्याशिवाय कोणताही युद्धविराम घेणार नाही अशी भूमिका इस्रायलकडून घेण्यात आली आहे. दरम्यान, हमासच्या तावडीतून पाच ओलिसांची सुटका झाली असून त्यामुळे उरलेल्या ओलिसांच्या कुटुंबीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
हेही वाचा >>> पत्रकारांची उपकरणे जप्त करणे गंभीर! सर्वोच्च न्यायालयाकडून मार्गदर्शक तत्त्वांची आवश्यकता अधोरेखित
हमासबरोबरचे युद्ध संपल्यानंतर गाझामधील एकंदर सुरक्षेची जबाबदारी इस्रायलवरच असेल असे नेतान्याहू यांनी या मुलाखतीत सांगितले. त्यामुळे इस्रायल गाझा पट्टीमधून माघार घेणार नसल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.
या युद्धामध्ये आतापर्यंत १०,३२८ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला असून त्यामध्ये ४,२३७ मुलांचा समावेश आहे अशी माहिती गाझामधील आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिली. दुसरीकडे गाझा पट्टीमध्ये इंधनाचा पुरवठा झाला नाही तर सर्व सेवा कोलमडून पडतील असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या मानवतावादी मदत कार्यालयाकडून देण्यात आला आहे. गाझा पट्टीत आतापर्यंत मदत आणि वैद्यकीय सामग्री घेऊन ५६९ ट्रक आले आहेत. मात्र त्यामध्ये इंधनाचा समावेश नाही. इंधनाचा वापर हमासच्या अतिरेक्यांकडून केला जाईल असे कारण देत इस्रायलने गाझामध्ये इंधनपुरवठा रोखून धरला आहे.