दमास्कस : सिरीयातील इराणच्या दूतावासावर इस्रायलने हवाई हल्ला केला असल्याचे वृत्त तेथील सरकारी प्रसारमाध्यमांनी दिली आहे. या हल्ल्यात इमारतीमधील वाणिज्य दूतावासाचा भाग उद्ध्वस्त झाला असून आतमधील सर्वजण ठार झाले आहेत किंवा जखमी झाले आहेत असे या वृत्तात म्हटले आहे. मात्र, इराणने भारतीय वेळेनुसार रात्री उशिरापर्यंत या वृत्ताची अधिकृत पुष्टी केलेली नव्हती. तसेच इस्रायलच्या लष्करानेही यावर काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

हेही वाचा >>> अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगामध्ये

या हल्ल्यात किमान सहाजण ठार झाले असे ब्रिटनमधील ‘सिरीयन ऑब्जव्‍‌र्हेटरी फॉर ह्युमन राइट्स’ या युद्धविरोधी संस्थेने सांगितले. सिरीयामधून वार्ताकन करणाऱ्या अरबी भाषक ‘अल-आलम’ या इराणी सरकारी वाहिनीने आणि संपूर्ण अरब देशांमध्ये प्रसारण होणाऱ्या ‘अल-मायदीन’ या वाहिनीने असे वृत्त दिले आहे की, या हल्ल्यामध्ये इराणचे लष्करी सल्लागार जनरल अली रझा जाहदी ठार झाले आहेत. जाहदी यांनी २०१६पर्यंत लेबनॉन आणि सिरीयामधील ‘कुद्स फोर्स’ या प्रमुख दलाचे नेतृत्व केले आहे.

हेही वाचा >>> “तुमच्या घराचं नाव बदललं तर…?”, अरुणाचल प्रदेशवरून परराष्ट्र मंत्र्यांनी चीनला पुन्हा सुनावलं!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिरीयाचे परराष्ट्रमंत्री फैजल मकदाद यांनी इराणचे सिरीयातील राजदूत हुसेन अकबरी यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना सांगितले की या हल्ल्यात अनेक लोक मारले गेले आहेत. मात्र, त्यांनी त्यापेक्षा जास्त माहिती दिली नाही. या हल्ल्याचे सडेतोड उत्तर दिले जाईल असा इशारा राजदूत अकबरी यांनी दिल्याचे वृत्त आहे. इराणच्या सरकारी वाहिनीने माहिती दिली की उद्ध्वस्त झालेल्या वाणिज्य दूतावासामध्येच इराणच्या राजदूतांचे निवासस्थान होते. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मृतदेहांचा शोध घेण्याचे काम सुरू झाले.