देशभरातून शास्त्रज्ञांचे अभिनंदन

बेंगळुरू : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्राो) गुरुवारी अवकाशात दोन उपग्रहांच्या डॉकिंगचा प्रयोग यशस्वी केला. ‘इस्राो’च्या स्पेडेक्स (स्पेस डॉकिंग एक्सपरिमेंट) मोहिमेचा हा भाग होता. असा प्रयोग करणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतर चौथा देश ठरला आहे. शास्त्रज्ञांच्या या यशाबद्दल देशभरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध नेत्यांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. ‘इस्रो’चे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनीही शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. ‘इस्रो’ने ‘एक्स’वरील टिप्पणीत म्हटले, ‘अंतराळाच्या इतिहासात भारताने नाव कोरले. ‘इस्रो’च्या ‘स्पेडेक्स’ मोहिमेमध्ये ऐतिहासिक डॉकिंगचा प्रयोगाला यश आले. या क्षणाचा साक्षीदार होण्याचा अभिमान आहे. डॉकिंगच्या प्रयोगानंतर दोन्ही उपग्रह एकच असल्यासारखे त्यांच्यावर नियंत्रण मिळविण्यात आले. आता डॉकिंगपासून पुन्हा मूळ स्थितीत जाणे आणि ऊर्जा हस्तांतराकडे येत्या काही दिवसांत पाहिले जाईल.’

यापूर्वी दोनदा डॉकिंगचा प्रयोग पुढे ढकलण्यात आला होता. १२ जानेवारी रोजी दोन्ही उपग्रह एकमेकांपासून ३ मीटर अंतरावर आणण्यात आले होते आणि पुन्हा त्यांना दूर केले होते. ‘इस्रो’ने ३० डिसेंबर रोजी ‘स्पेडेक्स’ मोहिमेला सुरुवात केली.

हेही वाचा >>> Hindenburg : “कितने गाझी आये, कितने गाझी गये”, हिंडनबर्ग बंद करण्याची घोषणा; आदाणी समूहाचा टोला

पीएसएलव्ही-सी ६० मोहिमेमध्ये प्रत्येकी २२० किलो वजनाचे दोन स्पेडेक्स उपग्रह वर्तुळाकार कक्षेत सोडण्यात आले. या मोहिमेत संशोधन आणि विकासासाठी आणखी २४ ‘पे-लोड’ आहेत. हे ‘पे-लोड्स’ आहेत, उपग्रह नव्हेत. ‘पीएसएलव्ही’ रॉकेटच्या चौथ्या टप्प्यात ते जोडले जातील. पुढील दोन महिने त्यावर प्रयोग करण्यात येतील. ही केवळ एकच स्पेडेक्स मोहीम नसेल, तर नंतर अनेक अशा मोहिमा होतील. दोन्ही उपग्रहांचे वजन प्रत्येकी २२० किलो आहे.

या उपग्रहांची निर्मिती, चाचणी ‘अनंत टेक्नॉलॉजीज लिमिटेड’ने (एटीएल) केली आहे. कंपनीच्या बेंगळुरू येथील अत्याधुनिक केंद्रात उपग्रहांची निर्मिती करण्यात आली.

खासगी क्षेत्रासाठी अनंत संधी

इस्राोच्या यशस्वी उपग्रह डॉकिंग प्रयोगामुळे अंतराळाच्या खासगी क्षेत्रासाठी अनंत संधी उपलब्ध झाल्या आहेत, असा विश्वास अंतराळ उद्योग संघटनांनी व्यक्त केला. खासगी क्षेत्रात वाढ झाल्यास भारताला स्वत:चे अंतराळ स्थानक निर्माण करता येईल, असे संघटनांनी सांगितले. भारतीय अंतराळ संघटनेचे (आसएसपीए) महासंचालक लेफ्टनंट जनरल ए. के. भट्ट यांनी सांगितले की, हा प्रयोग खरोखरच आमच्या अंतराळ कार्यक्रमांना पुढे नेण्यापासून ते भविष्यात आमचे स्वत:चे अंतराळ स्थानक स्थापन करण्यापर्यंत अनेक शक्यतांचे दरवाजे उघडतो. या प्रयोगामुळे खासगी अंतराळ उद्योग वेगाने वाढणार असल्याचे ते म्हणाले.

‘इस्रो’तील शास्त्रज्ञांचे आणि अवकाश क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांचे डॉकिंग प्रयोग यशस्वी केल्याबद्दल अभिनंदन. भारताच्या पुढील अवकाश मोहिमांसाठी हा महत्त्वाचा टप्पा आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘इस्रो’ने अखेर करून दाखवले. ‘स्पेडेक्स’ने अविश्वसनीय कामगिरी केली. डॉकिंगचा प्रयोग यशस्वी झाला आणि हे सर्व देशी यंत्रणेच्या सहाय्याने. ही ‘भारतीय डॉकिंग’ यंत्रणा आहे. चांद्रयान-४, गगनयान मोहिमांसह भविष्यातील अवकाशमोहिमा त्यामुळे सुरळीत होतील. – जितेंद्र सिंह, केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान व अवकाश राज्यमंत्री