पीटीआय, इस्लामाबाद

‘‘भारताबरोबर असलेले सर्व वादग्रस्त विषय शांततापूर्ण मार्गाने आणि चर्चेद्वारे सोडवले जाऊ शकतात,’’ असे पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी शनिवारी स्पष्ट केले. ते म्हणाले, की राजनैतिक मार्गाने मुत्सद्देगिरीने भारत-पाकिस्तानदरम्यान अगदी काश्मीर प्रश्नासह सर्व प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो. त्यामुळे दोन्ही देशांदरम्यान सातत्याने होणारा संघर्ष टळेल.

‘इस्लामाबाद सुरक्षा संवाद’ या दोनदिवसीय परिषदेत समारोपाच्या दिवशी संबोधित करताना बाजवा यांनी हे वक्तव्य केले. आंतरराष्ट्रीय धोरणतज्ज्ञांसह पाकिस्तानने आयोजित केलेल्या ‘सर्वंकष सुरक्षा : आंतरराष्ट्रीय सहकार्याचे पुनर्मूल्यांकन’ या विषयावर आंतरराष्ट्रीय सुरक्षेसमोरील आव्हानांवर ही परिषद आयोजित केली होती.

बाजवा यांनी सांगितले, की शांततामय आणि समृद्ध पश्चिम व दक्षिण आशिया, हे पाकिस्तानचे ध्येय आहे. जगात आखाती प्रदेशांसह इतरत्र एकतृतीयांश जागतिक लोकसंख्या ही संघर्षांत अडकली आहे. त्यामुळे आपल्या प्रदेशातील संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न करणे फार गरजेचे आहे. भारताची तयारी असेल तर काश्मीर प्रश्नासह सर्व प्रश्नांवर संवाद आणि राजनैतिक मार्गाने तोडगा काढण्यास पाकिस्तान तयार आहे. आपल्या प्रदेशातील सुमारे तीनशे कोटी जनतेच्या शांतता व समृद्धीसाठी इतिहासाचे जोखड तोडून आणि सर्व पूर्वग्रह राजकीय नेतृत्वाने बाजूला ठेवणे गरजेचे आहे. मात्र, भारतीय नेतृत्वाची हटवादी भूमिका यातील मोठा अडथळा आहे. काश्मीरचे तीन केंद्रशासित प्रदेशांत ऑगस्ट २०१९ मध्ये विभाजन झाल्यापासून भारत-पाकिस्तानमध्ये तणाव आहे.

पाकिस्तानसह चीनशी चर्चेचा प्रस्ताव?

बाजवा यांच्या भारतासह शांततेच्या प्रस्तावामागे व्यापक अर्थ आहे. त्यांनी अप्रत्यक्षरीत्या भारत, पाकिस्तान आणि चीन अशी त्रिपक्षीय चर्चा व्हावी, असे सुचवले. आपल्या भाषणात भारत आणि चीनदरम्यान सुरू असलेला सीमा तणावाचा मुद्दादेखील पाकिस्तानसाठी चिंतेचा विषय असल्याचे बाजवा यांनी म्हटले. या मुद्दय़ावर चर्चा आणि राजकीय मुत्सद्देगिरीने तोडगा काढता येऊ शकतो, असेही त्यांनी सुचवले.

‘भारताच्या क्षेपणास्त्र हाताळणी क्षमतेविषयी शंका’

गेल्या महिन्यात भारतातून पाकिस्तानात चुकून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्राच्या घटनेचा उल्लेख करून बाजवा म्हणाले, की उच्च तंत्रज्ञानयुक्त क्षेपणास्त्र यंत्रणा हाताळण्याच्या भारताच्या क्षमतेविषयी शंका या अपघातातून निर्माण झाली आहे. या अपघाताविषयीचा तपशील पाकिस्तानला न सांगण्याच्या भारताच्या भूमिकेने या संशयात भरच पडली आहे. हे गंभीर प्रकरण असून, भारताने आपली क्षेपणास्त्रे, अस्त्रे सुरक्षित असल्याचे पाकिस्तानसह जगाला पटवून देणे आवश्यक आहे. स्वनातीत क्षेपणास्त्र एका अण्वस्त्रधारी देशातून दुसऱ्या देशात चुकून डागले जाण्याची घटना इतिहासात प्रथमच घडली आहे.