पुढील आठवड्यामध्ये भाजपामध्ये प्रवेश करत आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात करणारे मेट्रो मॅन म्हणून ओळखले जाणारे ई. श्रीधरन यांनी शेतकरी आंदोलनासंदर्भात भाष्य केलं आहे. मागील काही आठवड्यांपासून दिल्लीच्या सीमांवर सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनासंदर्भात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलीय. केंद्रातील मोदी सरकारने लागू केलेल्या कायद्याला होणारा विरोध पाहून केंद्र सरकारने काहीही केलं तरी त्याला विरोध करण्याची फॅशनच देशात आलीय असा टोला शेतकरी आंदोलनासंदर्भात बोलताना श्रीधरन यांनी लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की पाहा >> ‘मेट्रो मॅन’ भाजपा प्रवेशाआधीच प्रचंड आशावादी; म्हणाले, “केरळमध्ये कमळ फुलवणार आणि गरज पडल्यास…”

शेतकऱ्यांना नवीन कायदे समजून घ्यायचे नाहीयत किंवा राजकीय हेतूमुळे ते हे कायदे समजून घेऊ इच्छित नाहीत, असं म्हणत श्रीधरन यांनी शेतकरी आंदोलनावर टीका केलीय. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार श्रीधरन यांनी, “केंद्र सरकारने काहीही केलं तरी त्याला विरोध करा अशी फॅशनच देशात आलीय. सरकारला काहीही करायचं असलं की दूर्देवाने त्याला विरोधच केला जातो,” असंही म्हटलं आहे.

केरळमधील विधानसभा निवडणुकींआधी ई. श्रीधरन हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती केरळ भाजपाचे के. सुरेंद्रन यांनी दिली. २१ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या भाजपाच्या विजय यात्रेदरम्यान ई. श्रीधरन औपचारिकरित्या भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. २००२ रोजी दिल्ली मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली तेव्हा मेट्रोची धुरा ई. श्रीधरन यांच्याकडे होती. त्याचप्रमाणे ई. श्रीधरन यांनी कोकण रेल्वेच्या बांधकामासाठीही मोलाचं मार्गदर्शन केलं होतं. ई. श्रीधरन हे ८८ वर्षांचे असून त्यांचा जन्म मद्रास संस्थानामध्ये १९३२ साली करुकापुथूर येथे झाला होता. श्रीधरन यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्मान मिळालेले आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी केलेल्या कामानिमित्त त्यांचा जगभरामध्ये नावलौकिक आहे. २००१ साली त्यांना पद्मश्री तर २००८ साली पद्म विभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. २००५ साली फ्रान्स सरकारने त्यांना विशेष पुरस्कार जाहीर केला होता. तर २००३ साली टाइम मॅगझिनने त्यांचा उल्लेख आशियाज हिरो या नामावंत व्यक्तींच्या यादीमध्ये केला होता. सध्या श्रीधरन हे एका पुलाच्या बांधकामाच्या प्रकल्पावर काम करत असून फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ते आपल्या सेवेतून निवृत्त होणार आहेत. निवृत्तीनंतर ते सक्रीय राजकारणामध्ये प्रवेश करणार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It has become fashion in this country that whatever the central govt does oppose it says e sreedharan scsg
First published on: 19-02-2021 at 18:48 IST