नव्या कृषी कायद्यासंबंधी केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये पार पडलेली चर्चेची ११ वी फेरीदेखील निष्फळ ठरली आहे. शेतकरी नेत्यांनी यावेळी आपण प्रजासत्ताक दिनी ठरल्याप्रमाणे ट्रॅक्टर मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं आहे. बैठक संपल्यानंतर शेतकरी नेत्यांनी ज्यापद्धतीने आपल्याला वागणूक देण्यात आली त्यातून अपमान झाल्याचं सांगत संताप व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे  केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना प्रस्तावावर उद्यापर्यंत निर्णय घेण्यास सांगितलं असल्याची माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मंत्र्यांनी आम्हाला साडे तीन तास वाट पहायला लावली. हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. जेव्हा ते आले तेव्हा आम्हाला सरकारच्या प्रस्तावावर विचार करण्यास सांगितलं. तसंच आता बैठकांची प्रक्रिया संपवत असल्याचंही म्हणाले,” अशी माहिती किसान मजदूर संघर्ष समितीचे श्रवण सिंह पंढेर यांनी दिली आहे. शेतकऱ्यांचा आंदोलन शांततेच्या मार्गाने यापुढेही सुरु राहील असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.

भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी प्रजासत्ताक दिनी ठरल्याप्रमाणे ट्रॅक्टर मोर्चा काढणार असल्याचं सांगितलं आहे. बैठकीबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, “सरकारने आमच्यासमोर नव्या कृषी कायद्यांना दोन वर्षांसाठी स्थगिती देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसंच हा प्रस्ताव स्वीकारण्याची तयारी असेल तरच चर्चेची पुढील फेरी होईल असंही म्हणाले आहेत”. शेतकरी संघटनांनी आधीच सरकारचा प्रस्ताव नाकारला आहे.

कृषीमंत्री काय म्हणाले-
“संघटना शेतकऱ्यांच्या हिताची चर्चा करत नसल्याने चर्चा निष्फळ ठरली आहे. याबद्दल मला दुख: आहे. सरकार पर्याय देत असतानाही शेतकरी संघटनांना फक्त कृषी कायदे रद्द करा अशीच मागणी करत आहेत. आम्ही त्यांनी शेतकरी आणि देशहितासाठी प्रस्तावावर फेरविचार करण्यास सांगितलं आहे. उद्यापर्यंत निर्णय कळवण्यास आम्ही सांगितलं आहे,” अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली आहे. काहींना हे आंदोलन असंच सुरु राहावं आणि यामधून तोडगा निघू नये असं वाटत असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It was an insult says farmers after round 11 of talks with government sgy
First published on: 22-01-2021 at 19:09 IST