Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री तथा खासदार कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशातील राजकारण अशा विविध विषयांवर नेहमीच रोखठोक मतं मांडत असतात, वेगवेगळ्या विषयांवर बिनधास्त प्रतिक्रिया दिल्यामुळे अनेकदा ट्रोलही होतात. दरम्यान, खासदार कंगना रणौत यांनी आज त्यांच्या २०२० मध्ये केलेल्या एका वक्तव्याबाबत माफी मागितली आहे.

खासदार कंगना राणौत यांनी २०२० मध्ये शेतकरी आंदोनाबाबत एक वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यावरून मोठा गदारोळ निर्माण झाला होता. मात्र, त्यानंतर आता थेट पाच वर्षांनी कंगना राणौत यांनी भटिंडा न्यायालयात माफी मागितली आहे. ते फक्त एक मीम होतं आणि मी ते रिट्विट केलं होतं, असं कंगना राणौत यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

दरम्यान, २०२० ते २१ च्या दरम्यान शेतकरी आंदोलनाबाबत कंगना राणौत यांनी एक वादग्रस्त टिप्पणी केली होती. कंगना राणौत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ८७ वर्षांच्या महिला शेतकऱ्याबाबत ‘ही महिला १०० रुपये घेऊन आंदोलनात बसली’, अशा प्रकारची पोस्ट केली होती. मात्र, या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यावरून मोठ्याप्रमाणात टीकाही झाली होती.

या प्रकरणात कंगना राणौत यांच्या विरुद्ध मानहानीचा दावा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गेले जवळपास पाच वर्ष हे प्रकरण न्यायालयात सुरू होतं. यानंतर अखेर पाच वर्षांनी आज कंगना राणौत यांनी सोमवारी भटिंडा न्यायालयात हजर होत माफी मागितली. तसेच आपल्याकडून अशा प्रकारची पोस्ट ही गैरसमजातून झाल्याचं म्हटलं आहे.

यावेळी कंगना राणौत यांनी म्हटलं की, “ते फक्त एक मीम होतं. त्यामध्ये मी काही लिहिलेलं नव्हतं. पण मी ते फक्त रिट्विट केलं होतं. मला वाटलं नव्हतं की यामुळे एवढा वाद होईल. पण तरी माझ्या कृतीमुळे कुणाला दुःख झालं असेल तर मी माफी मागते.”