Supreme Court on Air India Plane Crash Report : अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा १२ जून रोजी अपघात झाला होता. या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला होता. हा अपघात नेमका कसा घडला? याचा तपास यंत्रणांकडून तपास करण्यात येत आहे. या घटनेबाबत काही दिवसांपूर्वी एक अहवाल समोर आला होता. त्या अहवालात सदर पायलटची चूक असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, त्याविरोधात विमान अपघातात मृत्यू झालेल्या पायलटच्या वडिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती.

या याचिकेवरील सुनावणी दरम्यान आता सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाची टिप्पणी केली आहे. ‘अपघातासाठी पायलटला दोषी ठरवता येत नाही’, असं पायलटच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

एअर इंडिया विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पायलटच्या वडिलांनी या घटनेची स्वतंत्र चौकशीची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने महत्वाची टिप्पणी केली. तसेच पायलटच्या वडिलांच्या मागणीबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि डीजीसीएकडून उत्तर मागितलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने काय टिप्पणी केली?

“पायलटला दोषी ठरवता येत नाही, तुम्ही (पायलटचे वडील) स्वतःवर भार उचलू नका”, असं सर्वोच्च न्यायालयाने पायलटचे वडिलांना सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने पुढे असंही म्हटलं की, ‘एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या (एएआयबी) प्राथमिक अहवालात पायलटची चूक असल्याचं दिसून येत नाही.’

नेमकं घटना काय घडली होती?

अहमदाबाद वरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा १२ जून रोजी अपघात झाला होता. या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला होता. एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमान अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर काही क्षणांतच कोसळलं होतं. धावपट्टीवरून उड्डाण भरल्यानंतर विमानान जवळपास ६५० फूट उंची गाठली आणि त्यानंतर ते झपाट्यानं खाली येऊन एका इमारतीवर कोसळलं. या दुर्घटनेत विमानातील अनेक प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याशिवाय विमानाचा स्फोट झाल्यानं इमारतीत राहणाऱ्या काही नागरिकांनाही आपले प्राण गमवावे लागले. या भीषण दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

ब्लॅक बॉक्समध्ये नेमकं काय आढळलं?

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या माहितीनुसार, अपघातस्थळावरून ताब्यात घेतलेल्या ब्लॅक बॉक्सची तपासणी सुरू आहे. एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्यूरोच्या प्रयोगशाळेत त्याच्या मेमरी मॉड्यूलमधून डेटा यशस्वीरीत्या डाऊनलोड करण्यात आला आहे. हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की मानवी चुकीमुळे झाला हे स्पष्ट करण्यासाठी आता तपासकर्त्यांकडून या डेटाचं विश्लेषण केलं जात आहे.