जम्मू काश्मीरमधील पम्पोरमध्ये सोमवारी सकाळी एका सरकारी इमारतीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. इमारतीमध्ये मुक्कामाला असलेल्या पोलिसांच्या एका तुकडीला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले असून दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक सुरू आहे. पोलिसांनी इमारतीला वेढा घातला आहे.

पम्पोरमध्ये उद्योजकता विकास संस्थेच्या आवारातील एका इमारतीमध्ये पोलिसांची तुकडी थांबली होती. या तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या इमारतीमध्ये सकाळी आगदेखील लागली असून अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखलही झाले आहे. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव अग्निशमन दलाला इमारतीमध्ये आवारात प्रवेश नाकारण्यात आला आहे. गोळीबाराच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरुन गेला आहे. सुरक्षा दलांनी परिसर रिकामा केला असून दहशतवाद्यांसोबत चकमक सुरु आहे. नेमक्या किती दहशतवाद्यांनी हा हल्ला केला हे अद्याप अस्पष्ट आहे. या चकमकीत एक जवान जखमी झाला आहे.

पम्पोरमध्ये उद्योजकता विकास संस्थेमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याची ही वर्षभरातील दुसरी घटना आहे. फेब्रुवारीमध्ये हल्ल्यात  भारताचे तीन जवान शहीद झाले असून ही चकमक सुमारे दोन दिवस सुरु होती. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते.