वेगळ्या तेलंगणाच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाविरोधात गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसलेले वायएसआर कॉंग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांना बुधवारी रात्री पोलीसांनी बळजबरीने रुग्णालयात हलविले. 
जगनमोहन यांना हैदराबादमधील निजाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये दाखल करण्यात आले आहे. पाच दिवसांपासून उपोषण सुरू असल्यामुळे त्यांची प्रकृती बुधवारी खालावली होती. त्यांच्या जीवाला कोणताही धोका निर्माण होऊ नये, म्हणून त्यांना रुग्णालयात नेण्याचा निर्णय पोलीसांनी घेतला. जगनमोहन आपल्या निवासस्थानाबाहेरच उपोषणाला बसले होते. बुधवारी रात्री अकराच्या सुमारास पोलीसांनी त्यांच्या घराजवळील बॅरीकेड्स हटवत उपोषणस्थळी प्रवेश केला आणि रेड्डी यांना उचलून रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलविले.
जगनमोहन यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण घटले असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना उपोषण मागे घेण्याचा सल्ला दिला आहे, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते के. रामकृष्ण यांनी सांगितले. जगनमोहन रेड्डी लवकरात लवकर तंदुरुस्त व्हावेत आणि त्यांनी पुन्हा पक्षाचे नेतृत्त्व करावे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jagan taken into preventive custody sent to hospital amid fears of falling health
First published on: 10-10-2013 at 12:26 IST