पंजाबमधील नाभा कारागृहातील प्रकारानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांच्याशी चर्चा केली. नाभा कारागृहातून फरार झालेल्या कैद्यांच्यासंदर्भात त्यांनी पंजाब सरकारकडून अहवाल मागविला आहे. तसेच पंजाबमधील सर्व कारागृहांच्या सुरक्षा व्यवस्था वाढविण्याच्या सुचना देखील राजनाथ सिंग यांनी यावेळी दिल्या आहेत. पोलिसांच्या वेषात नाभा कारागृहात घुसून दहा अज्ञातांनी गोळीबार केला होता. यामध्ये त्यांनी कारागृहातील हरमिंदर मिंटूसह ४ कैद्यांना घेऊन फरार झाले होते. यापार्श्वभूमीवर केंद्रीय गृहराज्यमंत्री राजनाथ सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांशी दुरध्वनीवरुन संपर्क साधला. या घटनेसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये १५ मिनिटे चर्चा केली.
दरम्यान बादल यांनी घटनेची पूर्ण माहिती देत यासंदर्भात सरकारने आरोपींना पकडण्यासाठीच्या तपासाची माहिती राजनाथ सिंग यांना दिली. संबंधित घटनेच्या तपासासाठी केंद्राकडून आवश्यक मदत पुरविण्यास केंद्र सरकारने तयारी दर्शविली आहे. दरम्यान पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांनी देखील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्याशी चर्चा केली. आरोपींना पकडण्यासाठी पंजाब सरकारच्या तपासाची माहिती त्यांनी अजित डोवल यांना दिली. भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानकडून हा हल्ला करण्यात आला असू शकतो, असा संशय पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांनी व्यक्त केला आहे.




दोन दिवसांपूर्वीच राजनाथ सिंग यांनी हैदराबादमधील पोलीस संमेलनामध्ये पंजाब आणि अन्य राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेला सतर्क राहण्यास सांगितले होते. राजकीय किंवा दहशतवादी दलांकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशांतता निर्माण होणार नाही याविषयी सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या.
पंजाबमधील नाभा कारागृहातून खलिस्तान लिबरेशन फोर्सचा प्रमुख हरमिंदर मिंटूसह चार कैदी फरार झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, रविवार सकाळी पोलिसांच्या गणवेशामध्ये १० सशस्रधारक अज्ञातांनी नाभा कारागृहात घुसले. तुरुंगात घुसल्यानंतर त्यांनी बेधुंद गोळीबार केला. हल्ल्यानंतर त्यांनी लिबरेशन फोर्सचा प्रमुख दहशतवादी हरमिंदर मिंटूसह ४ कैद्यांची तुरुंगातून सुटका करुन फरार झाले आहेत. लिबरेशन फोर्सचा प्रमुख हरमिंदर मिंटूसह या हल्लेखोरांनी आणखी चार कैद्यांना तरुंगातून पळवून नेले आहे. यामध्ये गुरप्रीत सिंग, विकी गोंदरा, नितीन देओल आणि विक्रमजीत सिंग या कैद्यांचा समावेश आहे.
सूत्रांकडून मिळणाऱ्या वृत्तानुसार, पंजाबमधील कारागृहावर हल्ला करणाऱ्या दहा जणांपैकी एकाला उत्तर प्रदेशच्या शामली परिसरात अटक करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्रे देखील सापडली आहेत. पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.