पीटीआय, नवी दिल्ली
पश्चिम बंगालमध्ये स्वबळाचा नारा देणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे मन वळविण्याचा काँग्रेसकडून प्रयत्न होत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी ममता यांच्याशी चर्चा केली, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सांगितले. आता मार्ग सापडेल, असेही ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपात सहमती घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू असतानाच ममता यांच्या घोषणेमुळे इंडिया आघाडीच्या ऐक्याला तडा गेला. आमच्या पक्षाने आता बंगालमध्ये एकट्यानेच लढण्याचा निर्णय घेतला आहे, असे ममता यांनी जाहीर केले. त्यामुळे इंडिया आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर आता जयराम रमेश यांनी वक्तव्य केल्याने काँग्रेसकडून आघाडी टिकविण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत.
हेही वाचा >>>भारतीय अर्थव्यवस्थेची दमदार कामगिरी; प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचा संदेश
खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पश्चिम बंगाल तसेच देशाच्या इतर भागात भाजपला पराभूत करणे हा आमचा एकमेव उद्देश आहे. ममता बॅनर्जी यांच्याशी खरगे यांनी चर्चा केली आहे. त्यांच्याशिवाय आम्ही पश्चिम बंगालमध्ये लढू शकत नाही. त्या विरोधी गटाच्या अविभाज्य, अत्यावश्यक आधारस्तंभ आहेत. विरोधकांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, त्यांच्याशिवाय विरोधी गट पूर्ण नाही, असे जयराम रमेश म्हणाले.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेने आसाममधून गुरुवारी पश्चिम बंगालमध्ये प्रवेश केला आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर ही यात्रा पुढे सरकणार आहे. यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असेही जयराम रमेश म्हणाले.
ममता यांच्या ‘एकला चलो रे’ या घोषणेनंतर ‘आप’नेही स्वबळाचा नारा दिला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री मान यांनीही काँग्रेसबरोबर आघाडी होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.