पीटीआय, कर्नाल (हरियाणा)

‘‘आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून अधोरेखित करण्यासाठी भारत जोडो यात्रा काढण्यात आलेली नाही,’’ असे काँग्रेसचे सरचिटणीस व संपर्कप्रमुख जयराम रमेश यांनी शनिवारी स्पष्ट केले.भारत जोडो यात्रा सध्या हरियाणातून जात आहे. यावेळी पत्रकारांशी झालेल्या संवादात रमेश बोलत होते.

रमेश यांनी सांगितले, की या यात्रेदरम्यान आर्थिक विषमता, सामाजिक ध्रुवीकरण आणि राजकीय हुकूमशाही हे तीन मुद्दे ठळकपणे मांडण्यात राहुल गांधी यशस्वी झाले आहेत. एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना रमेश म्हणाले, की राहुल गांधींना काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जनमानसावर ठसवण्यासाठी ही यात्रा काढण्यात आलेली नाही. ही एक विचारसरणी घेऊन निघालेली यात्रा आहे. राहुल गांधी त्याचा प्रमुख चेहरा आहेत. ही त्यांची व्यक्तिगत यात्रा नाही. ही निवडणूक प्रचारयात्राही नाही. त्यामुळे ही यात्रा या कारणासाठी काढण्यात आली आहे का, असे विचारणे चुकीचे आहे. ही काँग्रेस पक्षाची यात्रा आहे.(भारत जोडो यात्रा शनिवारी कर्नालमध्ये पोहोचल्यानंतर मुष्ठियोद्धा विजेंदर सिंह याने राहुल गांधी यांच्यासोबत मार्गक्रमणा केली.)