भारतीय नौदलातील ८ निवृत्त अधिकाऱ्यांना कतारच्या न्यायालयाने थेट मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली असून भारतानेदेखील या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आज या ८ निवृत्त अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांची आज भेट घेतली. याप्रकरणी सरकार गांभीर्याने प्रयत्न करत असल्याचं आश्वासन त्यांनी कुटुंबीयांना दिलं. याबाबत X वर त्यांनी माहिती दिली आहे.

कतारमध्ये एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या भारताच्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना कतारमधील एका कनिष्ठ न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली आहे. कतारमधील यंत्रणेने त्यांना ३० ऑगस्ट २०२२ रोजी अटक केली होती. या वर्षी २९ मार्च रोजी त्यांच्याविरोधातील खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली. कॅप्टन नवतेजसिंग गिल, कॅप्टन सौरभ वसिष्ठ, कमांडर पुरेनेन्दु तिवारी, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगुनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल व खलाशी रागेश अशी या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हे सर्व भारतीय अल दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजिस अॅण्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संरक्षण सेवा पुरविणाऱ्या कंपनीत काम करीत होते. रॉयल ओमान एअर फोर्समधून निवृत्त झालेले वैमानिक व ओमानी नागरिक खमिस अल अजमी यांच्या मालकीची ही कंपनी आहे. या आठ भारतीयांसह त्यांनाही अटक करण्यात आली होती. मात्र, नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांची सुटका करण्यात आली.

हेही वाचा >> भारताच्या आठ माजी नौसैनिकांना कतारने फाशीची शिक्षा का सुनावली? त्यांच्यावर कोणते आरोप ठेवण्यात आले?

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आज सकाळीच या आठही अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीबाबत ते म्हणाले की, “कतारमध्ये अटकेत असलेल्या ८ भारतीयांच्या कुटुंबीयांची आज सकाळी भेट घेतली. सरकार या खटल्याबाबत गंभीर असून या प्रकरणाला महत्त्व देत आहे. कुटुंबांच्या चिंता आणि वेदना आम्ही समजू शकतो. त्यांच्या सुटकेसाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत राहील. त्या संदर्भात कुटुंबांशी समन्वय साधला जाणार आहे.”

कतारने भारतीय अधिकाऱ्यांना कधी आणि का अटक केली?

आठही जणांना कतारी गुप्तचर यंत्रणा स्टेट सिक्युरिटी ब्युरोने अटक केली होती; ज्याची माहिती सप्टेंबरच्या मध्यात भारतीय दूतावासाला देण्यात आली. ३० सप्टेंबरला प्रथमच त्यांना कुटुंबातील सदस्यांशी दूरध्वनीद्वारे बोलण्याची परवानगी देण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर जवळपास महिनाभराने ३ ऑक्टोबरला भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना आठही भारतीयांना भेटण्याची परवानगी देण्यात आली. पुढचे काही महिने या नौसैनिकांना आठवड्यातून एकदा कुटुंबीयांशी दूरध्वनीवर बोलण्याची परवानगी देण्यात आली होती.

हेही वाचा >> कतारने मृत्यूदंडाची शिक्षा दिलेले नौदलातील आठ माजी अधिकारी कोण आहेत? जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या आठ भारतीय माजी नौसेना अधिकाऱ्यांवर काय आरोप ठेवण्यात आले, याची माहिती अद्याप सार्वजनिक केली गेलेली नसली तरी त्यांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये एकांतवासात बंदिस्त केल्यामुळे हे प्रकरण सुरक्षेशी संबंधित असल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे.