उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचं नाव बदलण्याचा निर्णय झाला आहे. योगी आदित्यनाथ सरकारने घेतलेल्या निर्णयाला केंद्रीय गृह मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. केंद्रीय राज्य मंत्री जितीन प्रसाद यांनी केंद्राकडे जलालाबादचं नाव बदलण्याची मागणी केली होती. जी मंजूर करण्यात आली आहे. २७ जून २०२५ ला उत्तर प्रदेश सरकारने जलालाबाद हे नाव बदलून परशुरामपुरी केलं जावं असा प्रस्ताव असलेलं पत्र केंद्राला पाठवलं होतं. या नामांतराला केंद्राने मंजुरी दिली आहे. परशुरामपुरी हे नाव असण्याला आमचा आक्षेप नाही असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. पत्रात पुढे असं म्हटलं आहे की हे नाव देवनागरी (हिंदी), रोमन (इंग्रजी) आणि इतर भाषांमध्ये परशुरामपुरी असंच लिहिलं जाईल.

जितिन प्रसाद यांनी काय म्हटलं आहे?

जलालाबाद हे नाव बदलून परशुरामपुरी करण्याबाबत आमचा कुठलाही आक्षेप नाही. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने यासाठी संमती दिल्याबद्दल मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो असंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच हा सगळ्या सनातनी लोकांसाठी आणि धर्माभिमानी लोकांसाठी गौरवाचा क्षण आहे असंही जितिन प्रसाद यांनी म्हटलं आहे.

जलालाबादचं नाव बदलण्याचा निर्णय का घेण्यात आला?

जलालाबाद हे ठिकाण भगवान परशुराम यांचं जन्मस्थळ आहे. या ठिकाणी भगवान परशुराम यांचं पुरातन ऐतिहासिक मंदिरही आहे. त्यामुळे जलालाबादचं नाव परशुरामपुरी करण्यात यावं अशी मागणी करण्यात येत होती. ती मागणी आता मान्य करण्यात आली आहे. २०१८ आणि २०२३ या दोन वर्षांमध्ये यासंदर्भातले प्रस्ताव नगर परिषदेतही मंजूर झाले होते. आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाठवलेल्या प्रस्तावानंतर या नावला केंद्रानेही मंजुरी दिली आहे.