Jammu and Kashmir Kishtwar Cloudburst : जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये गुरुवारी दुपारी ढगफुटीची घटना घडली. या घटनेत आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच तब्बल १०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. या भीषण दुर्घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या ढगफुटीच्या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ मदतकार्य सुरू केलं आहे.

किश्तवाडच्या चोसीटी या दुर्गम भागात झालेल्या ढगफुटीच्या घटनेनंतर नेमकं काय घडलं? घटना घडली तेव्हा किती लोक त्या ठिकाणी होते? किती लोक यात वाहून गेले? या संपूर्ण भीषण घटनेचा थरारक प्रसंग एका स्थानिक व्यक्तीने सांगितला आहे. दरम्यान, ढगफुटी झाली तेव्हा मचैल माता यात्रेसाठी अनेक भाविक निघाले होते. तसेच अनेक यात्रेकरू तेथील एका नाल्यात आणि आजूबाजूच्या परिसरात उभे होते. मात्र, ढगफुटी झाली आणि काही कळण्याच्या आत अचानक नाल्यात वेगाने पूर आला. त्यामध्ये अनेकजण जण वाहून गेले, असं स्थानिक रहिवाशांने सांगितलं. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

स्थानिक रहिवाशांनी सांगितलं की, “दुपारी १ च्या दरम्यान ढगफुटी झाली, तेव्हा मचैल येथील काली माता मंदिराकडे जाण्यासाठी चोसीटी या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक जमले होते. चोसीटी येथे त्यांची वाहने पार्क केले होते. त्यानंतर त्या ठिकाणी लंगर देखील उभारण्यात आले होते. तसेच काही यात्रेकरू जसनाई नाल्याच्या बाजूने पायी मंदिरात जात होते. पण जेव्हा ढगफुटी झाली तेव्हा त्यापैकी बरेच जण नाल्यात उभे होते किंवा त्या जवळच उभा होते. पण काही सेकंदातच नाल्याच्या पाण्याची पातळी अचानक वाढली आणि अनेक जण वाहून गेले.”

दरम्यान, ही ढगफुटीची घटना घडल्यानंतर घटनास्थळी बचाव कार्यासाठी किश्तवाडचे उपायुक्त पंकज कुमार शर्मा यांनी सांगितलं की, “१०० हून अधिक लोकांना जवळच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सुमारे ३५ जणांना किश्तवाड येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांनी या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली असून अद्यापही काही जण बेपत्ता आहेत.

एनडीआरएफ, एसडीआरएफ, सुरक्षा दल, पोलीस आणि स्थानिक नागरिकांकडून या ठिकाणी बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच येथील काही अधिकाऱ्यांनी सांगितलं की ढगफुटी झाली तेव्हा परिसरात असलेले बरेच लोक पळून जाण्यात यशस्वी झाले. पण अजूनही काही जण बेपत्ता आहेत. त्या लोकांचा आम्ही शोध घेत आहोत.

पंतप्रधान मोदींनी काय प्रतिक्रिया दिली?

“जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवार येथे ढगफुटी आणि पुरामुळे बाधित झालेल्या सर्वांसोबत माझे विचार आणि प्रार्थना आहे. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे. बचाव आणि मदत कार्य सुरू आहे. गरजूंना सर्वतोपरी मदत केली जाईल,” असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.