गुजरातमधील निलंबित माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ताब्यात असणाऱ्या आरोपीचा मृत्यू झाल्याप्रकरणी न्यायालयाने संजीव भट्टला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जामनगर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. संजीव भट्ट याच्यासोबत अजून एक पोलीस अधिकारी प्रवीण सिंह यालाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९९० मध्ये जामनगरमध्ये भारत बंददरम्यान हिंसाचार झाला होता. यावेळी संजीव भट्ट जामनगर येथे एएसपी म्हणून कार्यरत होते. यावेळी ११३ लोकांना पोलिसांनी अटक केली होती. यामधील २५ जण जखमी झाले होते, तर आठ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. न्यायालयीन कोठडीत राहिल्यानंतर एक आरोपी प्रभुदास माधवजी वैश्नानी यांचा मृत्यू झाला होता. संजीव भट्ट आणि त्याच्या सहाकाऱ्यांवर आरोपीला कोठडीत मारहाण करण्याचा आरोप करण्यात आला होता. संजीव भट्ट आणि इतरांविरोधात याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता. पण गुजरात सरकारने खटला चालवण्याची परवानही दिली नव्हती. अखेर २०११ मध्ये राज्य सरकारने संजीव भट्ट याच्याविरोधात खटला चालवण्याची परवानगी दिली.

बुधवारी १२ जून रोजी सर्वोच्च न्यायालयाने संजीव भट्टच्या याचिकेवर पुनर्विचार करण्यास नकार दिला होता. भट्ट याने याचिकेत ११ साक्षीदारांची नव्याने चौकशी करण्याची मागणी केली होती. २०११ मध्ये कोणतीही परवानगी न घेता कर्तव्यावर गैरहजर राहिल्याने तसंच सरकारी वाहनांचा गैरवापर केल्याप्रकरणी संजीव भट्टवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. यानंतर ऑगस्ट २०१५ मध्ये निलंबन करण्यात आलं.

गुजरात उच्च न्यायालायने खटला सुरु असताना काही अतिरिक्त साक्षीदारांना साक्ष देण्यासाठी समन्स देण्याची मागणी फेटाळून लावली होती. गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयाला कनिष्ठ न्यायालयाने ३० वर्ष जुन्या प्रकरणात २० जून रोजी निर्णय सुरक्षित ठेवला असल्याची माहिती दिली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jamnagar sessions court custodial death ips officer sanjeev bhatt life imprisonment sgy
First published on: 20-06-2019 at 12:33 IST