सध्या जगासमोर करोना व्हायरसने आव्हान निर्माण केले आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या उपचार पद्धतीने करोना व्हायरसचा रुग्ण बरा होत असला तरी या व्हायरसवर अजून ठोस औषध सापडलेले नाही. जपानमधील ताप आणि सर्दीवरील एक औषध करोना व्हायरसच्या रुग्णांवर प्रभावी ठरत असल्याचे चीनच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे. द गार्डीयनने हे वृत्त दिले आहे.

जपानी कंपनीने बनवलेले फॅव्हीपीरावीर हे औषध करोनाव्हायरसवर प्रभावी ठरत आहे. वुहान आणि शेनझेन येथे ३४० रुग्णांवर या औषधाच्या वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या असे हँग शिनमीन या चीनच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले. हे औषध मोठया प्रमाणात सुरक्षित असून, उपचारामध्ये अत्यंत प्रभावी आहे असे हँग यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले.

शेनझेनमध्ये चार दिवसांपूर्वी करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाला हे औषध दिल्यानंतर त्यांचा करोना व्हायरसचा अहवाल निगेटिव्ह आला असे एनएचकेने म्हटले आहे. फॅव्हीपीरावीर दिलेल्या रुग्णांच्या फुप्फुसामध्ये ९१ टक्के सुधारणा दिसून आली. ज्यांना हे औषध दिले नाही, त्यांच्यात ६२ टक्के सुधारणा झाल्याचे म्हटले आहे. फुजीफिल्म टोयामा केमिकलने हे औषध बनवले आहे. अमेरिकेतही करोना व्हायरसवरील लसीच्या चाचण्या सुरु झाल्या आहेत.