युक्रेनच्या पूर्व सीमेजवळ रशियाची दीड लाख सैन्यतैनाती, पूर्व युक्रेनमधील रशियासमर्थक फुटीरतावाद्यांनी सुरू केलेली सैन्य जमवाजमव, डोनेत्स्क प्रांतातील नागरिकांचे रशियाकडे सुरू केलेले स्थलांतर आणि रशियाने केलेली अत्याधुनिक क्षेपणास्त्रांची चाचणी यामुळे संपूर्ण जगावर युद्धाचे ढग घोंघावू लागले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूर्व युक्रेनमधील रशिया-समर्थक फुटीरतावादी नेत्यांनी शनिवारी संपूर्ण लष्करी जमवाजमव करण्याचे आदेश दिल्याने पाश्चात्य नेत्यांनी रशियाच्या युक्रेनवरील संभाव्य आक्रमणाबद्दल गंभीर इशारा दिला. अमेरिकेनेही जगावर दाटलेल्या या युद्धछायेची दखल घेतली असून रशियाने युक्रेनवर हल्ला केलाच तर आम्ही त्याच्या वित्तीय संस्था आणि प्रमुख उद्योगांना लक्ष्य करू, असा इशारा दिला आहे. या संपूर्ण प्रकरणावर मंत्री जयंत पाटील यांनी भाष्य करत युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

जगावर युद्धछाया; युक्रेन-रशिया सीमेवर तणाव तीव्र, सैन्याची मोठय़ा प्रमाणावर जमवाजमव

“युक्रेन सीमेवरील परिस्थिती गेल्या १५ दिवसांपासून चिघळत चालली आहे. युक्रेनमध्ये सुमारे १८ हजार भारतीय अडकले आहेत. त्यापैकी बहुतांशी विद्यार्थी असून ते मदतीची वाट पाहत आहेत. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करतो की विद्यार्थ्यांची सुरक्षितता निश्चित करण्यासाठी आणि त्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे. कारण ते आपल्या देशाचे भविष्य आहेत,” असं जयंत पाटील यांनी म्हटलंय.

युक्रेनच्या लष्कराने सांगितले की, डोनेत्स्क प्रांतातील भागात शनिवारी गोळीबारात एका सैनिकाचा मृत्यू झाला, तर फुटीरतावाद्यांच्या सैन्याने चिथावणी देण्यासाठी निवासी भागात तोफांचा मारा केला. तर फुटीरतावद्यांनी शुक्रवारी युक्रेन आक्रमणाच्या तयारीत असल्याचा दावा करीत आपल्या ताब्यातील भागांतून शेकडो नागरिकांना रशियाकडे हलवण्यास सुरुवात केली आहे. महिला, मुले आणि वृद्धांना प्रथम बाहेर काढले जाईल, त्यांच्यासाठी रशियाने सर्व सुविधा तयार ठेवल्या आहेत, असे डोनेत्स्कमधील फुटीरतावादी सरकारचे प्रमुख पुशिलिन यांनी शुक्रवारी म्हटले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayant patil expresses concern over students stranded in ukraine asked modi for help hrc
First published on: 20-02-2022 at 11:26 IST