US Hindu Muslim Controversy: अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाचे उमेदवार जोहरान ममदानी यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणीवरून अतिउजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्या आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थक लॉरा लूमर आणि पत्रकार मेहदी हसन यांच्यात शाब्दिक वाद सुरू आहे.
जोहरान ममदानी यांनी काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्क सिटीत झालेल्या ९/११ दहशतवादी हल्ल्यानंतर न्यूयॉर्कमध्ये मुस्लिमांविरोधात भेदभाव झाल्याचे विधान केले होते. यानंतर उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी ममदानी यांच्या या विधानाची खिल्ली उडवली होती. त्यानंतर पत्रकार मेहदी हसन यांनी व्हान्स यांच्यावर टीका केल्याने हा वाद सुरू झाला.
व्हान्स खूप वाईट व्यक्ती
पत्रकार मेहदी हसन यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, “एका ब्राऊन (दक्षिण आशियाई) महिलेशी लग्न करून मिश्रवंशीय मुले जन्माला घातली आहेत आणि तरीही तुम्ही वांशिक भेदभावाचा अनुभव सांगणाऱ्या इतर ब्राऊन (दक्षिण आशियाई) लोकांची सार्वजनिकरित्या थट्टा करत आहात. व्हान्स खूप वाईट व्यक्ती आहेत.”
जेडी व्हान्स यांचे लग्न भारतीय वंशाच्या उषा व्हान्स यांच्याशी झाले आहे. त्या एक वकील असून धर्माने हिंदू आहेत.
त्या मुस्लिम असत्या, तर…
मेहदी हसन यांच्या या पोस्टला लक्ष्य करत लॉरा लूमर यांनी म्हटले की, “जेडी व्हान्स यांची पत्नी मुस्लिम नाही. जर त्या मुस्लिम असत्या, तर व्हान्स कधीही उपराष्ट्राध्यक्ष झाले नसते. कारण MAGA कधीही व्हाईट हाऊसमध्ये मुस्लिमांच्या प्रवेशाचे समर्थन करणार नाही. तुम्हाला वाटते का की हिंदू आणि मुस्लिम एकसारखे आहेत? उषा व्हान्स एक हिंदू अमेरिकन आहेत. आमची समस्या ब्राऊन लोकांशी नाही, ती इस्लामबाबत आहे.”
व्हान्स-ममदानी वाद
ब्रॉन्क्स मशिदीबाहेर ममदानी यांनी केलेल्या वक्तव्यावरून हा वाद निर्माण झाला आहे. ९/११ च्या हल्ल्यानंतर न्यू यॉर्कमधील मुस्लिमांना भेडसावणाऱ्या आव्हानांबद्दल भाष्य केले होते. “मी माझ्या काकूंच्या अनुभवांबाबत सांगायचे आहे. त्यांनी ९/११ नंतर सबवे ने प्रवास करणे थांबवले होते. कारण त्यांना हिजाबमध्ये सुरक्षित वाटत नव्हते”, असे ममदानी म्हणाल होते.
ममदानी यांच्या या विधानानंतर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी एक्सवर ममदानी यांची खिल्ली उडवत म्हटले होते की, “जोहरानच्या मते, ९/११ चा खरा बळी त्यांच्या काकू होत्या.”
