बिहारमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सत्तारूढ जद(यू), राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि काँग्रेसने आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे.
बिहारचे मुख्यमंत्री येत्या ३० जुलै रोजी मुंबईहून पाटणा येथे परतणार असून त्यानंतर आघाडीबाबत आणि कोणता पक्ष किती जागा लढणार याची अंतिम घोषणा करण्यात येणार आहे. राजदचे नेते प्रभुनाथसिंग यांनी आघाडी करण्याचा निर्णय झाल्याचे वार्ताहरांना सांगितले.
बिहारचे मंत्री श्याम राजक आणि जद(यू)चे आमदार विनोदसिंग यांनी शनिवारी राजदचे नेते लालूप्रसाद यांच्या निवासस्थानी जाऊन कोणता पक्ष किती जागा लढविणार, त्याबाबत चर्चा केली. या वेळी राजद विधिमंडळ पक्षाचे नेते अब्दुल बारी सिद्दिकी उपस्थित होते.
राजदच्या नेत्यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते त्याला हजर राहण्यासाठी आपण आलो होतो, असे राजक यांनी सांगितले. पोटनिवडणुकीत आघाडी करण्याचा निर्णय त्यापूर्वीच झाला असल्याचे त्यांनी वार्ताहरांना सांगितले.
भाजपचा पराभव करण्यासाठी जद(यू) आणि राजदसह पोटनिवडणूक लढण्याची आमची इच्छा आहे, असे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रेमचंद मिश्रा यांनी सांगितले. काही आमदार लोकसभेवर निवडून आल्याने आणि काही जणांनी राजीनामा दिल्याने १० जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. पुढील वर्षी बिहार विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होणार असल्याने या पोटनिवडणुकीकडे उपान्त्य फेरी म्हणून पाहिले जात आहे.