बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांच्याविरोधात भुमिका घेतलेले शरद यादव यांना पक्षातून काढून टाकण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पक्षाचे महासचिव के. सी. त्यागी यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार शरद यादव यांना पक्षातून आणि वरिष्ठ सभागृहातून बाहेर काढण्याची तयारी सुरु केली आहे. यासंदर्भात त्यागी यांनी यादव यांना एक पत्र पाठवले आहे.

उद्या लालू प्रसाद यादव यांच्या ‘राजद’कडून येथे एका रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. याला शरद यादव यांनी पाठींबा दर्शवल्याने त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यागी यांनी लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे की, २७ ऑगस्ट रोजी पटना येथे राजद आयोजित रॅलीमध्ये सहभागी होण्याचा तुम्ही स्वतःहून निर्णय घेतला आहे. त्यामुळे तुम्ही यात सहभागी झाल्यास पक्षाची शिस्त मोडल्याचा ठपका ठेवत आपल्या मर्जीने तुम्ही ‘जदयू’ हा पक्ष सोडत असल्याचे मानले जाईल.

पत्रात पुढे लिहिले आहे की, जदयूने भाजपसोबत आघाडी केल्यानंतरच तुम्ही पक्ष शिस्तीचे उल्लंघन सुरु केले आहे. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतही तुम्ही भाग घेतलेला नाही. त्यामुळे सतत पक्षविरोधी काम करीत असल्याने जदयूने यादव यांच्या राज्यसभेच्या सदस्यत्वलाही अयोग्य ठरवले आहे. मात्र, पक्षाच्या सिद्धांतांचे उल्लंघन केल्यामुळे यादव यांच्यावर काय कारवाई होणार याबाबत त्यांनी कुठलेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

शरद यादव हे जदयूच्या संस्थापक अध्यक्षांपैकी एक आहेत. त्यामुळे त्यांचे पक्षात समर्थकही मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळेच उद्या होणाऱ्या लालू प्रसाद यादव यांच्या रॅलीमध्ये यादव सहभागी होण्याचे टाळतील अशी आशा जदयूकडून व्यक्त केली जात आहे.

बिहारमध्ये जदयूने राजद आणि काँग्रेससोबत महागठबंधन निर्माण करून सत्ता काबिज केली होती. मात्र, राजद नेते आणि लालूपुत्र तेजस्वी यादव यांच्यावर सीबीआयने भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने राजद नेते आणि पक्षाचे अध्यक्ष नितिश कुमार यांनी महागठबंधन तोडून भाजपसोबत हातमिळवणी केली आणि पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आपल्याला विचारात न घेता नितिशकुमार यांनी केलेले हे कृत्य शरद यादव यांना रुचले नाही. त्यामुळे त्यांनी सध्या नीतिशकुमार यांच्याविरोधात पवित्रा घेतल्याचे चित्र आहे.