झारखंडमध्ये याचवर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांअगोदरच विरोधी पक्षांना मोठा झटका बसला आहे. विरोधी पक्षांमधील सहा आमदारांना आज भाजपात प्रवेश केला आहे. बुधावारी या आमदारांनी मुख्यमंत्री रघुबर दास यांच्या उपस्थितीत झारखंडची राजधानी रांचीत भाजपाचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकरले आहे.

भाजपात प्रवेश केलेल्या सहा आमदारांमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे आमदार कुणाल सारंगी, जे पी भाई पटेल, चमरा लिंडा, नवजवान संघर्ष मोर्चाचे भानु प्रताप शाही तर काँग्रेसचे सुखदेव भगत व मनोज यादव यांचा समावेश आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू झाल्याचे दिसत आहे.

८१ विधानसभा मतदासंघ असलेल्या झारखंडमधील बहुतांश क्षेत्र नक्षलग्रस्त आहे. यामुळे निवडणुकीदरम्यान आयोगासमोर प्रचंड आव्हाने असतात. तसंच सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर निमलष्करी दलाची सर्वाधिक गरज भासते. आयोगाकडून झारखंडमधील विधानसभा निवडणूक अनेक टप्प्यांत घेतली जाण्याची शक्यात आहे. झारखंडमधील नक्षलग्रस्त भागांची परिस्थिती पाहता एक-दोन टप्प्यांत निवडणुका घेणं आयोगानुसार कठीण बाब आहे. मागील वेळेस आयोगानं झारखंडमध्ये पाच टप्प्यांत मतदान प्रक्रिया राबवली होती.