Jharkhand Political Crisis : देशात सध्या झारखंडमधील राजकारण चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. झारखंडमधील राजकारणात सथ्या मोठ्या वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना बुधवारी रात्री अटक केल्यानंतर आज (१ फेब्रुवारी) काही वेळापूर्वी सक्तवसुली संचालनालयाच्या न्यायालयात हजर करण्यात आलं. तर हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यादेखील ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्या आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेलं आहे. सर्वोच्च न्यायालय याप्रकरणी शुक्रवारी सुनावणी करणार आहे.

दरम्यान, झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे सभागृह नेते चंपई सोरेन आता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. चंपई सोरेन यांनी सत्तास्थापनेचा दावा केला आहे. परंतु, राज्यपालांनी अद्याप चंपई यांना शपथ ग्रहण करण्यासाठी आमंत्रित केलेलं नाही. चंपई सोरेन यांचे सहकारी आमदार सध्या रांची येथील सर्किट हाऊसवर उपस्थित आहेत. ते सध्या राज्यपालांच्या आमंत्रणाची प्रतीक्षा करत आहेत. या सर्व आमदारांनी राज्यपालांकडे भेटण्याची वेळ मागितली आहे.

कर्नाटक, महाराष्ट्र आणि बिहारमधील सत्तांघर्षावरून धडा घेत चंपई सोरेन यांनी ‘प्लॅन बी’ तयार ठेवला आहे. चंपई सोरेन यांना राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केलं नाही तर झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आमदारांना तेलंगणात हालवलं जाईल. हैदाराबाद विमातळावर बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. आमदार फूटण्याच्या भीतीने चंपई सोरेन त्यांच्या आणि काँग्रेसच्या सर्व आमदारांना हैदराबादला हालवण्याच्या तयारीत आहेत. आमदारांना तिकडे नेण्यासाठी खासगी विमानाची (चार्टर्ड प्लेन) व्यवस्थादेखील करण्यात आली आहे.

दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीने उद्या (२ फेब्रुवारी) सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. भाजपाच्या गोटात कुठल्या राजकीय योजना आखल्या जात आहेत, याकडे चंपई सोरेन, काँग्रेस आणि प्रसारमाध्यमांचं लक्ष लागलं आहे.

हे ही वाचा >> “…तर वाराणसी मतदारसंघात मोदींच्या पराभवासाठी मोहीम सुरू होईल”, भाजपा नेत्याचा पंतप्रधानांना इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असं आहे विधानसभेचं गणित

झारखंडमध्ये विधानसभेच्या एकूण ८१ जागा आहेत. बहुमतासाठी ४१ जागांची आवश्यकता आहे. हेमंत सोरेन यांनी झारखंड मुक्ती मोर्चा (३०), काँग्रेस (१७), राजद (१), राष्ट्रवादी काँग्रेस (१), मार्क्स आणि लेनिवादी कम्युनिस्ट पार्टी (१) या पक्षांच्या साथीने झारखंडमध्ये सत्तास्थापन केली होती. सत्ताधाऱ्यांकडे एकूण ५० आमदार आहेत तर चंपई सोरेन यांच्या विरोधात ३१ आमदार आहेत. यापैकी, भाजपाचे २६, आजसूचे दोन आणि तीन अपक्ष आमदार आहेत.