पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी एक खास टी शर्ट भेट दिला आहे. या टी शर्टवर एक खास संदेश लिहिला आहे. बायडन यांनी मोदींना दिलेल्या या टी-शर्टची आणि त्यावर लिहिलेल्या संदेशाची जोरदार चर्चा आहे.
अमेरिका दौऱ्यात मोदींनी मोठ्या उद्योगपतींबरोबर घेतली. यावेळी बायडनही उपस्थित होते. त्याचवेळी बायडन यांनी मोदींना हा खास लाल टी शर्ट भेट दिला. जो बायडन यांनी नरेंद्र मोदींना टी शर्ट भेट दिल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा गडगडात केला.
टी शर्टवर नेमकं काय लिहिलं आहे?
बायडन यांनी मोदींना दिलेल्या शर्टवर लिहिलं आहे, “भविष्य एआयचं आहे, इंडिया अँड अमेरिका.”
मोदींनीही बायडन टी शर्ट देतानाचा फोटो शेअर करत म्हटलं, “कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) असो किंवा भारत-अमेरिका, भविष्य एआयचं आहे. जेव्हा आम्ही एकत्रित काम करतो तेव्हा दोन्ही राष्ट्र मजबूत होतात. ही दोन राष्ट्रं एकत्र काम करतात तेव्हा पृथ्वीलाही फायदा होतो.”
बायडन यांच्या उपस्थितीत उद्योगपतींबरोबर झालेल्या बैठकीत अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टिम कूक, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी, महिंद्रा समुहाचे प्रमुख आनंद महिंद्रा यांच्यासह अनेक लोक सहभागी झाले होते.
नरेंद्र मोदींनी बायडेन यांना भेट दिली चंदनाची खास पेटी
दरम्यान, मोदींनी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी, अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना खास भेटवस्तू दिल्या. विशेष म्हणजे मोदी यांनी बायडेन यांना दिलेल्या एका पेटीची चांगलीच चर्चा रंगली. या पेटीमध्ये काय आहे? पेटीमध्ये लिहिलेल्या ‘दृष्टसहस्त्रचन्द्रो’ याचा अर्थ काय? असे प्रश्न विचारले जात आहेत.
बायडेन यांना दिलेल्या भेटीत भारताच्या विविधतेचे दर्शन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल बायडेन यांना एक खास हिरा भेट म्हणून दिला आहे. हा हिरा ७.५ कॅरेटचा आहे. तर मोदी यांनी बायडेन यांना भेट म्हणून चंदनाच्या लाकडापासून बनवलेली एक पेटी दिली आहे. या पेटीत वेगवेगळ्या भेटवस्तू आहेत.
चंदनाच्या पेटीवर लिहिलेले आहे ‘दृष्टसहस्त्रचन्द्रो’
मोदी यांनी बायडेन यांनी दिलेली लाकडी पेटी ही म्हैसूरमधील चंदनाच्या लाकडापासून बनवलेली आहे. ही पेटी जयपूरमधील कारागीरांनी तयार केली आहे. पेटीवर ‘दृष्टसहस्त्रचन्द्रो’ असे लिहिलेले आहे. ज्या व्यक्तीने एक हजार पौर्णिमेचे चंद्र पाहिलेले आहेत, अशा व्यक्तींना ही खास भेट देण्यात येते. ज्या व्यक्तीचे वय ८० वर्षे ८ महिने आहे, अशांनादेखील ही खास भेट दिली जाते.
बायडेन यांना देण्यात आलेल्या लाकडाच्या पेटीत नेमके काय आहे?
ही पेटी बनवण्यासाठी कर्नाटकमधील म्हैसूर येथून खास चंदन मागवण्यात आले होते. तसेच ही पेटी राजस्थानमधील जयपूर येथील कारागिरांनी तयार केलेली आहे. या पेटीमध्ये एक गणेशमूर्ती आहे. गणेशाला विघ्नहर्ता म्हणतात. सर्व देवांच्या अगोदर गणेशाची पूजा केली जाते. ही मूर्ती कोलकाता येथील एका सुवर्णकाराने घडवलेली आहे.
या पेटीमध्ये एक दिवादेखील आहे. दिवा मंदिरामध्ये देवासमोर ठेवण्यात येतो. दिव्याला पवित्रतेचे स्थान असल्यामुळे बायडेन यांना मोदी यांनी पेटीमध्ये दिवादेखील भेट दिला आहे. हा दिवा चांदीचा असून तो कोलकाता येथील कारागिरांनी बनवलेला आहे.
एखाद्या व्यक्तीने पौर्णिमेचे एकूण १ हजार चंद्र पाहिलेले असतील तर वेगवेगळ्या वस्तू दान करण्याची प्रथा आहे. यामध्ये गौदान, भूदान, तिळदान, हिरण्यादान (सोने), अजयदान (तूप), धान्यदान, वस्त्रदान, गुळदान, रौप्यदान (चांदी), लवणदान (मीठ) अशा वस्तू देण्यात येतात.
चांदीचा नारळ, चांदीचा शिक्का अन् बरंच काही
भूदान म्हणून चंदनाच्या लाकडापासून बनवलेली पेटी दिली जाते. हिरण्यदान म्हणून मोदी यांनी बायडेन यांना दिलेल्या पेटीत सोन्याचा शिक्का आहे. या पेटीत ९९.५ टक्के शुद्ध चांदीचा शिक्कादेखील आहे. लवणदान म्हणून या पेटीत गुजरातमधील मीठ ठेवण्यात आलेले आहे. गोदानाचं (गायीचं दान) प्रतीक म्हणून पश्चिम बंगालमधल्या कारागिरांनी घडवलेला चांदीचा नारळ या पेटीमध्ये आहे. तसेच पंजाबमधील तूप, उत्तराखंडमधील तांदूळ, तामिळनाडूचे तीळ, महाराष्ट्राचा गूळ अशा वस्तू या पेटीत ठेवण्यात आलेल्या आहेत.
