गेल्या आठवड्याभरापासून कॅनडातील खलिस्तान समर्थक हरदीप सिंग निज्जर हत्या प्रकरण चर्चेचा विषय ठरलं आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी देशाच्या संसदेतच यासंदर्भात निवेदन सादर करताना भारताचा या हत्येमध्ये सहभाग असल्याचा आरोप केला. त्यामुळे द्विपक्षीय संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर जागतिक पटलावर हे प्रकरण चर्चेत आलं असून आय फाईव्ह आघाडीतील कॅनडाचे मित्रराष्ट्र असणाऱ्या अमेरिका व ऑस्ट्रेलियानं कॅनडाच्या बाजूने भूमिका घेतली आहे. आता जो बायडेन यांनी हा मुद्दा जी २० परिषदेवेळी झालेल्या चर्चेत मोदींसमोर मांडला होता, अशी माहिती समोर येत आहे.

नेमकं काय घडलं?

१८ जून रोजी कॅनडाच्या व्हँकोव्हरमध्ये हरदीप सिंग निज्जरची दोन अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. दोन महिन्यांच्या तपासानंतर जस्टिन ट्रुडोंनी भारताच्या सहभागाचे आरोप केले. यासंदर्भातले पुरावे काही आठवड्यांपूर्वी भारताला सोपवल्याचाही दावा त्यांनी केला. भारतानं कॅनडाचे आरोप फेटाळले आहेत. दोन्ही देशांनी एकमेकांच्या उच्चपदस्थ राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. भारतानं कॅनडातील आपली व्हिसा सेवा तात्पुरती स्थगित केली आहे.

एकीकडे कॅनडाकडून गंभीर आरोप केले जात असताना अमेरिकेच्या किमान पाच उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी भारताला तपासात सहकार्य करण्याची विनंती करताना कॅनडाच्या बाजूने भूमिका घेतली आहे. देश कोणताही असला, तरी दुसऱ्या देशाच्या सार्वभौमत्वाचा मुद्दा उपस्थित होत असेल, तर तो आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, अशी भूमिका अमेरिकेचे अधिकारी जाहीरपणे मांडत आहेत. त्याचवेळी कॅनडाला घाईगडबडीत निष्कर्षावर न येण्याचाही सल्ला अमेरिकेकडून देण्यात आला आहे.

भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाला द्विपक्षीय करारांची चिंता; संरक्षणमंत्री म्हणतात; “जर आरोप सिद्ध झाले…!”

बायडेन-मोदी चर्चा?

दरम्यान, आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येत आहे. जस्टिन ट्रुडो यांनी निज्जर हत्याप्रकरणात केलेल्या आरोपांबाबत १० दिवस आधीच जी २० परिषदेदरम्यान झालेल्या चर्चेत जो बायजेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहिती दिली होती, असं वृत्त फायनान्शियल टाईम्सच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे. या वृत्तानुसार अमेरिकेप्रमाणेच आय फाईव्ह या आघाडीतील ब्रिटन, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या देशांनीही मोदींशी या आरोपांबाबत आधीच चर्चा केली होती, असाही दावा करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खरंच चर्चा झाली का?

एकीकडे मोदी-बायडेन चर्चा झाल्याचं सांगितलं जात असताना दुसरीकडे जी २० परिषदेदरम्यान या दोन नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेच्या माहितीपत्रिकेत तसा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. दोन्ही नेत्यांकडून जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनामध्ये द्विपक्षीय संबंध अधिक सक्षम करण्याबाबत चर्चा झाल्याचा उल्लेख होता. त्यामुळे खरंच पंतप्रधान नरेंद्र मोदी व जो बायडेन यांच्यात कॅनडाच्या आरोपांवर चर्चा झाली होती का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.