राजस्थान रॉयल्सने (आरआर) जोस बटलरचा एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये संघाचा स्फोटक फलंदाज जोस बटलर आपल्या गोंडस मुलीला घेऊन वर्कआऊट करत आहे. या व्हिडिओला हजारो चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे.

व्हिडिओमध्ये बटलरची मुलगी जॉर्जिया तिच्या वडिलांसोबत व्यायाम करताना दिसत आहे. एका व्यायामप्रकारात बटलर तिला उचलून घेत व्यायाम करत आहे. आगामी आयपीएलसाठी सर्व संघ जय्यत तयारी करत असून, काही खेळाडू आपल्या क्वारंटाइन कालावधीत रूममध्येच व्यायामाला प्रोत्साहन देत आहेत.

 

आयपीएल 2021मध्ये जोस बटलर राजस्थान संघासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. नुकत्याच झालेल्या भारताविरुद्धच्या क्रिकेट मालिकेत बटलरने शानदार कामगिरी केली होती. बटलरने एकदिवसीय मालिकेत मॉर्गनच्या अनुपस्थितीत इंग्लंडचे कर्णधारपद भूषवले.

आयपीएलच्या मागील हंगामात जोस बटलरने 13 सामन्यांत 328 धावा केल्या. तर, 2019मध्ये त्याने 548 धावा केल्या. 2020च्या आयपीएलमध्ये बटलरची कामगिरी ‘ठीक’ असली. तरी, यावेळी तो आपल्या फलंदाजीने संघाला प्रगतीपथावर घेऊन जाण्याचे काम करेल.

या हंगामात 12 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स आपला पहिला सामना आयपीएल पंजाब किंग्जशी खेळणार आहे. आयपीएलचा चौदावा हंगाम 9 एप्रिल ते 30 मे या कालावधीत रंगणार असून उद्धाटनाचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात चेन्नई येथे खेळला जाईल.

राजस्थान रॉयल्सचा संघ

संजू सॅमसन (कर्णधार), बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, रियान पराग, श्रेयस गोपाल, राहुल तेवतिया, महिपाल लोमरोर, कार्तिक त्यागी, अँड्र्यू टाय, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, यशस्वी जयस्वाल, अनुज रावत, डेव्हिड मिलर, मनन वोहरा, ख्रिस मॉरिस, शिवम दुबे, मुस्तफिजुर रहमान, चेतन साकारिया, केसी करीप्पा, लियाम लिव्हिंगस्टोन, कुलदीप यादव, आकाश सिंह.