पीटीआय, गाझीपूर
उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारी याचा गुरुवारी रात्री उशिरा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील बांदा तुरुंगात तो शिक्षा भोगत होता. ६३ वर्षीय अन्सारी याला गुरुवारी जिल्हा तुरुंगातून बेशुद्धावस्थेत रानी दुर्गावती वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मात्र अन्सारीची पद्धतशीर कट रचून हत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
या आरोपांनंतर बांदा येथील मुख्य न्यायदंडाधिकारी भगवान दास यांनी मुख्तार अन्सारी याच्या मृत्यूच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले. अन्सारीच्या मृत्यूनंतर त्याच्या निवासस्थानी लोक मोठय़ा संख्येने जमा होत आहेत. गाझीपूर जिल्ह्यामधील अन्सारीचे मूळ गाव मोहम्मदाबाद युसुफपूर येथील दुकाने बंद करण्यात आली आहेत. अन्सारीचा मृतदेह त्याच्या मूळ गावी आणण्यात येईल. त्यामुळे तेथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठय़ा प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. बांदा, आणि गाजीपूरसह मऊ, बलिया आदी भागात मोठय़ा प्रमाणात सुरक्षा वाढवण्यात आली असून कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
हेही वाचा >>>‘व्याभिचार केल्यास महिलांना खुलेआम दगडाने ठेचून मारले जाणार’ तालिबानची घोषणा
अन्सारीच्या कुटुंबीयांनी काली बाग येथे त्याच्या दफनविधीची व्यवस्था केली आहे. अन्सारीचे शव शुक्रवारी १० वाजेपर्यंत ताब्यात मिळाल्यास शुक्रवारीच दफनविधी करण्यात येईल, असे कुटुंबीयांनी सांगितल्याची माहिती मोहम्मदाबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन कुमार उपाध्याय आणि सर्कल ऑफिसर अतार सिंह यांनी दिली. अन्सारीचे शवविच्छेदन बांदा येथे करण्यात आले. अन्सारीचा मुलगा उमर अन्सारीने वडिलांचे शवविच्छेदन दिल्ली एम्समध्ये करण्याची मागणी केली होती.
मुख्तार अन्सारी कोण होता?
मुख्तार अन्सारी याने वयाच्या १५ व्या वर्षी गुन्हेगारीत पाऊल टाकले. १९६३ मध्ये एका प्रभावशाली कुटुंबात जन्मलेल्या अन्सारीने राज्यात तेव्हा भरभराट झालेल्या सरकारी कंत्राट माफियांमध्ये स्वत:ची टोळी स्थापन केली. १९८६ पर्यंत तो कॉन्ट्रॅक्ट माफिया वर्तुळात एक प्रसिद्ध चेहरा बनला होता. त्याच्यावर एकूण ६५ गुन्हे दाखल होते. अन्सारी पाच वेळा आमदार राहिला होता.