बिहारमध्ये (जद)यू-राजदमधील संभाव्य आघाडीमुळे भाजप बिथरला आहे, अशी टीका करणारे माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावरच भाजपने प्रतिहल्ला चढविला आहे. भाजप बिथरलेला नाही, तर अशा प्रकारच्या आघाडीचे भवितव्य काय याची जनतेला चिंता आहे, असे भाजपने स्पष्ट केले आहे.
भाजप धास्तावलेला नाही, मात्र जद(यू)-राजद आघाडी झाली तर बिहारमध्ये पुन्हा ‘जंगलराज’ येईल या भीतीने जनतेला ग्रासले आहे. भाजपच्या भीतीने नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्याशी हातमिळवणी करण्याचा मार्ग पत्करला आहे. ज्या लालूप्रसाद यांच्याशी दोन दशके लढा दिला त्यांच्याशीच आता नितीशकुमार तडजोड करीत आहेत, असे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी म्हटले आहे.
नितीशकुमार यांनी आता आपल्या पक्षाचे नामकरण जद(यू)ऐवजी राष्ट्रीय जनता दल (यू) असे करावे, अशी सूचनाही मोदी यांनी केली आहे. जद(यू)-राजद युतीबाबत अद्याप निर्णयही झालेला नाही, तरीही भाजपला भीतीने ग्रासले आहे, अशी टीका नितीशकुमार यांनी केली होती. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जद(यू), राजद, काँग्रेस आणि डाव्या पक्षांची आघाडी करण्यास नितीशकुमार यांनी अलीकडेच अनुकूलता दर्शविली होती.