Puri Youtuber Inquiry in Connection With Jyoti Malhotra: गेल्या दोन दिवसांपासून हरियाणाची यूट्यूबर ज्योती मल्होत्रा चर्चेत आली आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपांखाली तिला अटक करण्यात आली आहे. ज्योती मल्होत्रा आयएसआयला भारताविषयी गोपनीय माहिती पुरवत होती, असा आरोप ठेवण्यात आला असून तिची सखोल चौकशी करण्यात येत आहे. यातच आता आणखी एका यूट्यूबर तरुणीचीही चौकशी सुरू झाली आहे. या तरुणीची ज्योती मल्होत्राशी मैत्री होती. त्यामुळे या यूट्यूबरचं ज्योती मल्होत्राच्या हेरगिरी प्रकरणाशी काही कनेक्शन आहे का? याचा तपास केला जात आहे.
इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार या यूट्यूबरनंदेखील ज्योतीसोबत तीन ते चार महिन्यांपू्र्वी पाकिस्तानातील कर्तारपूरला भेट दिली होती. या यूट्यूबरची ज्योती मल्होत्राशी मैत्री आणि पाकिस्तान भेट या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून तिची कसून चौकशी केली जात आहे. सदर यूट्यूबरदेखील ज्योती मल्होत्राप्रमाणेच ट्रॅव्हलॉग अर्थात प्रवासाचे व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर पोस्ट करते.
पुरीमध्ये झाली दोघींची भेट
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती मल्होत्राची ओडिशाच्या महिला यूट्यूबरशी पुरीमध्ये सप्टेंबर २०२४ मध्ये भेट झाली. ज्योती मल्होत्रानं या भेटीमध्ये जगन्नाथ पुरी मंदिराचे फोटो घेतल्याचं सांगितलं जात आहे. ही सर्व माहिती अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून पाकिस्तानला पाठवली जात होती, असाही संशय तपास यंत्रणांना आहे.
पुरीतील तरुणीनं आरोप फेटाळले
दरम्यान, ज्योती मल्होत्राच्या हेरगिरी प्रकरणाशी काही संबंध असल्याचे आरोप ओडिशातील यूट्यूबरनं फेटाळले आहेत. ज्योती मल्होत्रा माझी मैत्रीण होती, पण तिचं पाकिस्तान कनेक्शन किंवा हेरगिरीच्या प्रकरणाची मला माहिती नव्हती, असा दावा या तरुणीनं केला आहे. जर तिच्या या बाजूची मला माहिती असती, तर मी कधीच तिच्याशी मैत्री केली नसती, असंही या तरुणीनं सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे.
तरुणीच्या वडिलांचीही प्रतिक्रिया
दरम्यान, आपल्या मुलीचं ज्योती मल्होत्राशी चुकीच्या पद्धतीने नाव जोडलं जात असल्याची प्रतिक्रिया तिच्या वडिलांनी दिली आहे. “माझी मुलगी घरीच होती आणि तपास यंत्रणांना आम्ही पूर्णपणे सहकार्य करत होतो. माझी मुलगी चार महिन्यांपूर्वी पहलगामला गेली होती. त्यावेळी ज्योती मल्होत्रा तिच्यासोबत होती की नाही मला माहिती नाही. त्या दोघी मैत्रिणी आहेत. २०२४ मध्ये ज्योती मल्होत्राही पुरीला आली होती. दिल्लीतल्या एका ट्रॅव्हल कंपनीनं माझ्या मुलीची ती ट्रिप प्रायोजित केली होती. इतरही अनेक कंपन्यांनी तिला स्पॉन्सरशिप ऑफर केली आहे”, असं ते म्हणाले.