Kaali Poster Controversy: देशात सध्या ‘काली’ या माहितीपटाच्या पोस्टरवरुन वाद रंगला आहे. लीना मणीमेकलई यांनी या पोस्टरमधून हिंदूंच्या भावना दुखावल्या जात असल्याची टीका होत आहे. यादरम्यान तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी या वादावर केलेल्या विधानाची चर्चा आहे. मात्र पक्षाने आपल्या विधानापासून फारकत घेतल्याने महुआ मोईत्रा यांनी पक्षाचं ट्विटर अकाऊंट अनफॉलो केलं आहे. इंडिया टुडेच्या कार्यक्रमात बोलताना महुआ मोईत्रा यांनी माझ्यासाठी कालीमाता मांसाहार आणि मद्याचा स्वीकार करणारी आहे असं म्हटलं होतं.

“माझ्यासाठी कालीमाता मांसाहार, मद्याचा स्वीकार करणारी”, तृणमूल खासदार महुआ मोईत्रांचं विधान; ‘त्या’ पोस्टरवरून वाद!

महुआ मोईत्रा सध्या सोशल मीडियावर फक्त तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना फॉलो करत आहेत.

तृणमूल काँग्रेसने काय म्हटलं आहे –

“कालीमातासंबंधी महुआ मोईत्रा यांनी केलेली विधानं आणि मांडलेली मतं ही त्यांची वैयक्तिक भूमिका असून पक्ष कोणत्याही पद्धतीने त्याला पाठिंबा देत नाही. तृणमूल काँग्रेस अशा वक्तव्यांचा निषेध करतं,” असं ट्वीट तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आलं आहे.

नेमका वाद काय?

लीना मणिमेकलई यांनी काली हा माहितीपट तयार केला आहे. या माहितीपटाचं पोस्टर नुकतंच ‘ऱ्हिदम्स ऑफ कॅनडा’ नावाच्या कार्यक्रमात लाँच करण्यात आलं होतं. मात्र, तेव्हापासून ते सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागलं आहे. या पोस्टरमध्ये कालीमातेच्या तोंडात सिगारेट असल्याचं दाखवण्यात आलं आहे. मूळ दृश्यामधे कालीमातेच्या पेहेरावात असणारी महिला सिगारेट ओढत असल्याचं देखील दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आता वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात महुआ मोईत्रा यांना विचारणा केली असता त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर तीव्र आक्षेप घेतला जात आहे.

नेमकं काय म्हणाल्या महुआ मोईत्रा?

महुआ मोईत्रा यांनी प्रत्येकाला आपल्या ईश्वराविषयी कल्पना करण्याचं स्वातंत्र्य आहे, असं म्हटलं होतं. “माझ्यासाठी कालीमाता मांसाहार आणि मद्याचा स्वीकार करणारी आहे. तुमच्या ईश्वराविषयी कल्पना करण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे. काही ठिकाणी ईश्वराला व्हिस्की नैवेद्य म्हणून दिली जाते, तर काही ठिकाणी ही ईश्वरनिंदा ठरते”, असं महुआ मोईत्रा म्हणाल्या होत्या.

पाहा व्हिडीओ –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२ जुलै रोजी लीना मणीमेकलई यांनी या माहितीपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं होतं. मात्र, त्यावर नेटिझन्सनी तीव्र आक्षेप घेत लीना यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या या पोस्टवर आत्तापर्यंत हजारो प्रतिक्रिया आल्या असून त्यातील बहुतांश प्रतिक्रियांमध्ये त्यांच्यावर टीका करण्यात आल्याचं दिसून येत आहे.