कीव्ह : युक्रेनच्या रशिया नियंत्रित भागातील एका मोठय़ा धरणाची भिंत फुटल्यामुळे आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सुमारे २२ हजार नागरिकांचे स्थलांतर सुरू झाले असून झापोरीझ्झियाच्या अणुऊर्जा प्रकल्पालाही धोका असल्याचे सांगितले जात आहे. तर आगामी काळात रशिया नियंत्रित क्रिमियामध्ये पाणीटंचाईची शक्यता आहे. रशिया व युक्रेनने या घटनेसाठी एकमेकांवर घातपाताचे आरोप केले आहेत.

गेल्यावर्षी युक्रेनवर हल्ला केल्यानंतर रशियाने ताब्यात घेतलेल्या भागात नीपर नदीवर काखोव्हका धरण आहे. या धरणाची मोठी भिंत फुटली असून त्यातून मोठय़ा प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. परिणामी रशिया तसेच युक्रेनचे नियंत्रण असलेल्या भागांमध्ये पाणी शिरले.  धरणफुटीमुळे युरोपमधील सर्वात मोठय़ा झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्पामधील शीतकरण यंत्रणेवर परिणाम होण्याची भीती आहे. धरणावरील जलविद्युत प्रकल्पातून १५० मेट्रिक टन तेलाची गळती झाली असून आणखी ३०० मेट्रिक टन तेल नदीपात्रात मिसळले जाण्याची भीती आहे. 

यानंतर रशिया आणि युक्रेनने परस्परांवर आरोप केले. रशियन सैन्याने धरणाच्या भिंतीमध्ये स्फोट घडवून आणल्याचा आरोप युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी केला. दुसरीकडे, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे कार्यालय असलेल्या क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी हा युक्रेनने मुद्दाम घडवून आणलेला घातपात असल्याचा आरोप केला. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘रशिया दहशतवादी राष्ट्र’ रशिया हे दहशतवादी राष्ट्र असल्याचा दावा युक्रेनने आंतरराष्ट्रीय न्यायालयात केला. संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात मंगळवारी रशियाविरोधातील खटल्याची सुनावणी सुरू झाली. त्यावेळी आपल्या देशाची बाजू मांडताना युक्रेनने रशियावर दोषारोप केले.