लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना भाजपा काँग्रेसला मोठमोठे धक्के देत आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात काँग्रेसला तीन मोठे धक्के बसले आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला आहे. तसेच माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला आहे. दरम्यान, आता काँग्रेसचे दिग्गज नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचा मुलगा नकुलनाथ हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कमलनाथ यांना अनेक मुद्द्यांवरून भाजपाने वारंवार लक्ष्य केलं आहे. १९८४ च्या शीखविरोधी हत्याकांडातील त्यांच्या कथित भूमिकेमुळे भाजपामधील एक मोठा गट त्यांना पक्षात प्रवेश देण्याच्या विरोधात आहे. तरी मध्य प्रदेशमध्ये भाजपाला मजबूत करण्यासाठी पक्षश्रेष्ठी कमलनाथ यांना भाजपात घेण्यास तयार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, कलमनाथ यांनी गेल्या आठवड्यात प्रसारमाध्यमांसमोर बोलताना स्पष्ट केलं होतं की, माझा पक्षबदलाचा विचार नाही. तरीदेखील त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा थांबलेल्या नाहीत. अशातच आज (२७ फेब्रुवारी) पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी कमलनाथ यांना भाजपा प्रवेशाबाबत विचारलं. तुमच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम कधी लागणार? असा प्रश्न कमलनाथ यांना विचारण्यात आला. यावर कमलनाथ संतापून म्हणाले, तुम्ही पत्रकारच या अशा अफवा उडवता आणि नेत्यांकडून स्पष्टीकरण मागता, त्यांना त्या अफवांचं खंडण करायला लावता.

ज्येष्ठ काँग्रेस नेते कमलनाथ म्हणाले, ही अफवा तुम्ही प्रसारमाध्यमांनीच पसरवली आहे. दुसरी कुठलीही व्यक्ती याबाबत काही बोललेली नाही. तुम्ही कधी माझ्या तोंडून असं काही ऐकलं आहे का? किंवा मी कधी तसा इशारा दिला आहे का? तुम्ही माध्यमं आधी बातमी चालवता आणि मला विचारता. त्यामुळे तुम्ही लोकांनीच या बातम्यांचं खंडण केलं पाहिजे.

हे ही वाचा >> भारतीय अंतराळवीराचे २०४० ला चंद्रावर पाऊल? इस्रोचे अध्यक्ष स्पष्टच म्हणाले….

प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी

मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर कमलनाथ यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली. या निवडणुकीत भाजपाने २३० जागांपैकी एकूण १६३ जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसला केवळ ६६ जागांवर विजय मिळाला. त्याचबरोबर देशभरातील राज्यसभेच्या रिक्त जागांवर नुकतीच निवडणूक पार पडली. यावेळी कमलनाथ यांना राज्यसभेची उमेदवारी मिळेल, असं बोललं जात होतं. स्वतः कमलनाथ यांनीदेखील तशी अपेक्षा व्यक्त केली होती. परंतु, तसे झाले नाही. राहुल गांधी यांनीदेखील कमलनाथ यांना उमेदवारी देण्यास विरोध केल्याचा दावा केला जातोय. या सर्व कारणांमुळे कमलनाथ हे नाराज असल्याचे म्हटले जात आहे.