पीटीआय, वॉशिंग्टन

अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी गुरुवारी शिकागो येथे ‘डेमोक्रॅटिक नॅशनल कन्व्हेन्शन’च्या अखेरच्या दिवशी अधिकृतपणे पक्षाची उमेदवारी स्वीकारली. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी माजी अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली. अमेरिकेच्या अध्यक्षपदी पुन्हा ट्रम्प निवडून आल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी अमेरिकी नागरिकांना दिला.

भारतीय वारसा लाभलेल्या ५९ वर्षीय हॅरिस यांनी उमेदवारी स्वीकारल्यानंतर प्रेक्षकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. ‘होय, तुम्ही करू शकता!’ असे विधान त्यांनी केल्यानंतर टाळ्यांच्या कडकडाटासह नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. उमेदवारी स्वीकारताना हॅरिस यांनी आपली भूमिका आणि विकासाची दृरदृष्टी स्पष्ट केली. ‘‘देशाला पुढे नेण्यासाठी अमेरिकी जनता माझ्यावर विश्वास ठेवू शकते. देशाला जोडणारी राष्ट्राध्यक्ष मी होईन. अमेरिकी नागरिकांना समजून घेणारी राष्ट्राध्यक्ष होईन. मी अशी राष्ट्राध्यक्ष असेल, जिच्याकडे सदसदविवेकबुद्धी आहे, असे सांगत हॅरिस यांनी ट्रम्प यांना टोला लगावला.

हेही वाचा >>>Crime News : ट्यूशनवरुन घरी पतरणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, बेशुद्धावस्थेत सापडली मुलगी, कुठे घडली घटना?

५ नोव्हेंबरची निवडणूक ही अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची असल्याचे हॅरिस म्हणाल्या. या निवडणुकीमुळे आपल्या देशाला भूतकाळातील कटुता, निंदा आणि फुटीरतावादी लढाईतून पुढे जाण्याची मौल्यवान संधी आहे. कोणत्याही एका पक्षाचे किंवा गटाचे सदस्य म्हणून नाही, तर अमेरिकी म्हणून पुढे नवा मार्ग तयार करण्याची संधी आहे, असे हॅरिस यांनी आपल्या ४० मिनिटांच्या भाषणात सांगितले.

आईचे स्मरण

कमला हॅरिस यांनी भाषणात त्यांची आई श्यामला गोपालन यांचे स्मरण केले. माझ्या आईने रुजवलेली मूल्ये मला महत्त्वाची वाटतात. माझी आई १९ वर्षांची असताना विशिष्ट ध्येयाने भारतातून अमेरिकेत आली. तिने आम्हाला अन्यायाविषयी कधीही तक्रार करू नका, तर त्याबद्दल काहीतरी करायला शिकवले. कोणतीही गोष्ट कधीही अर्धवटपणे करू नका, तर ती पूर्ण करा. तू कोण आहेस, हे कोणाला सांगू नकोस, तर तू कोण आहे हे दाखवायचे असते, अशी शिकवण माझ्या आईने दिल्याचे हॅरिस म्हणाल्या.

हेही वाचा >>>Bus Accident : ४० भारतीयांना घेऊन नेपाळला जाणारी बस नदीत कोसळली, मदत आणि बचावकार्य सुरु

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२१ व्या शतकात अमेरिका जिंकेल, चीन नाही!

अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आल्यास २१ व्या शतकातील स्पर्धात चीन नाही, तर अमेरिकाच जिंकेल, असा अर्थव्यवस्थेबाबत ठाम विश्वास हॅरिस यांनी व्यक्त केला. अमेरिका आपले जागतिक नेतृत्वाचा त्याग करणार नाही, अशी खात्री त्यांनी दिली. आम्ही ‘संधी अर्थव्यवस्था’ तयार करणार आहोत, जिथे प्रत्येकाला स्पर्धा करण्याची संधी असेल आणि यशस्वी होण्याचीही संधी असेल. अंतराळ आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर जगाला भविष्यात नेणार आहोत, असे हॅरिस म्हणाल्या.