Kanpur Scooter Blast News : उत्तर प्रदेशमधील कानपूर शहरात मोठा स्फोट झाला आहे. उत्तर प्रदेशसह देशभरात अवैध फटक्यांच्या साठवणुकीबाबत, फटाक्यांच्या गोदामांबाबत, तिथल्या सुरक्षेबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात असतानाच बुधवारी (९ ऑक्टोबर) संध्याकाळी कानपूरमधील मेस्ट रोडवरील मिश्री बाजार चौकात एक मोठा स्फोट झाला. भर बाजारात झालेल्या या स्फोटामुळे मोठी हानी झाली आहे. एका स्कूटरमध्ये ठेवलेल्या फटाक्यांचा स्फोट झाला होता. त्यातून दोन स्कूटर पेटल्या. या दुर्घटनेत आठ ते दहा जण जखमी झाले आहेत. यापैकी आठ जणांना जवळच्या उर्सुला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

उर्सुला रुग्णालयात उपाचर घेत असलेल्या जखमींपैकी चार जण ५० टक्क्यांहून अधिक होरपळले आहेत. दरम्यान, पोलिसांनी या दुर्घटनेप्रकरणी पाच दुकानदारांना ताब्यात घेतलं आहे. हा स्फोट इतका मोठा होता की बाजारातील काही दुकानं व आसपासच्या घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. अनेक भिंतींना भेगा पडल्या आहेत. स्फोटानंतर पाच मिनिटं बाजारात सर्वत्र काळाकुट्ट धूर पसरला होता. सुदैवाने स्कूटरव्यतिरिक्त अन्य कुठल्याही वस्तूने पेट घेतला नाही, कुठल्याही दुकानाला आग लागली नाही. अन्यथा मोठी जीवित व वित्तहानी झाली असती.

फटाके विक्रेता फरार

कानपूरचे संयुक्त पोलीस आयुक्त आशुतोष कुमार म्हणाले, “प्राथमिक तपासानुसार हा स्फोट फटाक्यांमुळे झाल्याचं निदर्शनास आलं आहे. ज्या दुकानाबाहेर स्फोट झाला ते दुकान व आजूबाजूच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके होते. या घटनेनंतर दुकानदार फरार आहे. दुकानात देखील स्फोट झाल्याची शक्यता आहे. आम्ही या दुकानदाराला शोधण्यासाठी पथक रवाना केलं आहे.

ज्या स्कूटरमधील फटक्यांचा स्फोट झाला ती अश्वनी कुमार या कपड्याच्या व्यापाऱ्यांची आहे. ते देखील या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. त्यांच्या एका नातेवाईकाने सांगितलं की ते फटाके खरेदी करण्यासाठी गेले होते.