Kapil Sibal On Jagdeep Dhankhar whereabouts Video : राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांनी शनिवारी माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या ठावठिकाण्याबाबत प्रश्न उपस्थित केले. काही दिवसांपूर्वी धनखड यांनी आरोग्याचे कारण देत अचानक त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. पत्रकार परिषदेत सिब्बल यांनी आपण ‘लापता लेडीज’ चित्रपटाबद्दल ऐकले होते, पण ‘लापता (बेपत्ता) उपराष्ट्रपती’ याबद्दल पहिल्यांदाच ऐकतोय असे विधान केले.
कपिल सिब्बल नेमकं काय म्हणाले?
धनखड यांच्या आरोग्याबद्दल वाटत असलेली चिंता कमी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ते कुठे आहेत? याबद्दल निवेदन द्यावे अशी मागणी देखील सिब्बल यांनी यावेळी केली. सिब्बल म्हणाले की, “२१ जुलै रोजी धनखड यांनी त्यांचा राजीनामा दिला, आज ९ ऑगस्ट आहे आणि त्यांच्याबद्दल आम्हाला माहितीच नाही की ते कुठे आहेत. लापता लेडीज बद्दल तर मला माहिती होतं, लापता उपराष्ट्रपती हे तर पहिल्यांदाच ऐकलं. ते आपले उपराष्ट्रपती होते आणि ज्या पद्धतीने त्यांनी सरकारचे संरक्षण केले, आता वाटतंय की विरोधकांना त्यांचे संरक्षण करावे लागेल. धनखड कुठे आहेत?”
“मी स्वतः त्यांना फोन केला होता आणि त्यांच्या पीएसने फोन उचलला आणि सांगितले की ते आराम करत आहेत. त्यानंतर कोणी फोन उचलतच नाही. माझी अनेक राजकीय नेत्यांशी चर्चा झाली, ते सांगतात की ते देखील फोन करत आहेत. याची माहिती तर गृहमंत्रालयाकडे असेल ना? त्यामुळे अमित शाह यांनी जाहीर निवेदन दिले पाहिजे की ते कुठे आहेत,” असेही सिब्बल म्हणाले.
“त्यांची प्रकृची ठिक नव्हती, असे तर नाही ना की ते कुठेतरी उपचार घेत आहेत? त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील काहीच सांगितलं नाही. मग अडचण काय आहे? अशा गोष्टी आपण दुसऱ्या देशांबद्दल ऐकतो, भारत तर एक लोकशाही देश आहे ना? मग याची माहिती लोकांनी मिळाली पाहिजे,” असे सिब्बल म्हणाले.
#WATCH | On former Vice President Jagdish Dhankhar, Rajya Sabha MP Kapil Sibal says, "After his resignation, we do not know anything about his whereabouts. I had previously heard about the 'Laapataa Ladies,' but this is the first time I have heard about the 'Laapataa' vice… pic.twitter.com/RZrmJ8ni9E
— ANI (@ANI) August 9, 2025
एफआयआर करणं बरं दिसत नाही
सिब्बल पुढे बोलताना म्हणाले की, “माझे त्यांच्याशी वैयक्तिक इतके चांगले संबंध होते, वकील म्हणून देखील एकत्र काम केलं. मला तर काळजी वाटतेय. अशा प्रकरणात मी एफआयआर दाखल करू इच्छित नाही. ते बरं दिसत नाही. त्यांच्याकडून देखील कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही, ही देखील एक विचित्र बाब आहे.”
धनखड यांचा राजीनामा
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी २१ जुलै रोजी धनखड यांनी अचानक उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवलेल्या पत्रात धनकर यांनी आरोग्याच्या कारणास्तव आपण तात्काळ प्रभावाने राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.