बंगळूरु : विलक्षण चुरशीने लढल्या जात असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी संपला. राज्यातील २२४ जागांसाठी बुधवार दि. १० रोजी मतदान होत आहे. सत्तारूढ भाजपविरोधात काँग्रेस अशी येथे झुंज आहे. काही ठिकाणी धर्मनिरपेक्ष जनता दलाचीही ताकद आहे. गेले पंधरा दिवस देशभरातील प्रमुख नेते कर्नाटकमध्ये तळ ठोकून होते. वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप मोठय़ा प्रमाणात करण्यात आले. भाजपची सारी भिस्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यावर आहे. दक्षिणेतील हे महत्त्वाचे राज्य पुन्हा जिंकून भाजप ३८ वर्षांचा इतिहास मोडणार का? ही उत्सुकता आहे. तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसला कर्नाटक जिंकणे महत्त्वाचे आहे. येथे सत्ता आल्यास काँग्रेसचे महत्त्व वाढणार आहे. माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाने सत्तेसाठी सारी ताकद लावली आहे.
स्थिर सरकारची घोषणा सर्वच पक्षांनी दिली आहे. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र तसेच राज्यात एकाच पक्षाचे सरकार असल्यास विकास होईल यावर भर दिला. पंतप्रधानांनी १९ मोठय़ा सभा तसेच सहा रोड शो केले. निवडणूक जाहीर झाल्यापासून म्हणजेच २९ मार्चपासून सात वेळा पंतप्रधानांनी राज्याचा दौरा केला. भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी २०६ सभा तसेच ९० रोड शो केले. काँग्रेसचा प्रचार प्रामुख्याने राज्यातील नेत्यांनी केला. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अनेक सभा घेतल्या. राहुल गांधी तसेच प्रियंका गांधी यांनीही मोठय़ा प्रमाणात प्रचारात सहभाग घेतला.
एकनाथ शिंदे यांचा उडुपी, मंगळूरुत प्रचार
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उडुपी आणि मंगळूरुत भाजपच्या उमेदवारांसाठी रोड शो आणि सभांच्या माध्यमातून त्याचबरोबर समाजातील विविध स्तरांतील मान्यवरांशी संवाद साधून सोमवारी प्रचार केला. शिंदे यांचे मंगळूरु विमानतळावर कर्नाटकी पद्धतीने वाद्यवादन आणि पुष्पहार घालून जल्लोषात स्वागत करण्यात आले. मंगळूरुत वेगवेगळय़ा क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिकांसाठी विशेष स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिंदे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. कर्नाटकातील अनेक नागरिक हे महाराष्ट्राशी जोडले गेले आहेत. त्यामध्ये डॉक्टर, वकील, विकासक, हॉटेल व्यावसायिक, उद्योजक आदींचा समावेश असून शिंदे यांनी त्यांच्याशी मनमोकळी चर्चा केली आणि महाराष्ट्राशी असलेले नाते अधिक वृध्दिंगत व्हावे, असे आवाहन केले. त्यासाठी राज्य शासन सर्व सहकार्य करायला तयार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज मराठा असोसिएशनह्णतर्फे मंगलोर येथे सभेचेही आयोजन करण्यात आले होते. शिंदे यांनी धर्मस्थळ येथील श्री मंजुनाथ मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. उडुपी येथेही शिंदे यांनी रोड शोच्या माध्यमातून आणि सभा घेऊन भाजप उमेदवार हरीश पुंजा यांचा प्रचार केला.
३७५ कोटींचा मुद्देमाल जप्त
बंगळूरु : विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर २९ मार्चला आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून कर्नाटकमध्ये आतापर्यंत ३७५ कोटींपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने यासंबंधी माहिती दिली. यामध्ये १४७ कोटींची रक्कम, ८४ कोटींचे मद्य, ९७ कोटींचे सोने आणि चांदी, २४ कोटींच्या भेटवस्तूंचे वाटप आणि २४ कोटींचे अमली पदार्थ यांचा समावेश आहे.
राहुल गांधी यांचा बसमधून प्रवास बंगळूरु : प्रचाराच्या अखेरच्या दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी येथे शहर बसमधून प्रवास केला. यावेळी त्यांनी बस थांब्यावर महाविद्यालयीन विद्यार्थिनींशी चर्चा केली, तसेच बसमधील प्रवाशांबरोबरही संवाद साधला. या विद्यार्थिनींचे आणि नोकरदार महिलांची स्वत:च्या राज्याबद्दल काय स्वप्ने आहेत, दृष्टिकोन आहे ते राहुल यांनी जाणून घेतले असे काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले. या महिलांनी महागाई, गृहिणींसाठीची ‘गृहलक्ष्मी’ योजना आणि महिलांना बसमधून मोफत प्रवासाची काँग्रेसची योजना याबद्दल मत व्यक्त केल्याचे सांगण्यात आले.