मला कर्नाटकचे मुख्यमंत्री बनण्याची ऑफर देण्यात आली होती. त्याबदल्यात त्यांनी मला २५०० कोटींची व्यवस्था करण्यास सांगितलं होतं, असा दावा माजी खासदार आणि विजयपुरा शहराचे आमदार बसनगौडा पाटील यत्नल यांनी केला. कर्नाटकातील भाजपा आमदाराने केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, यत्नल यांच्या दाव्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली असून, कर्नाटकात प्रत्येक कामासाठी दर ठरवले जात असल्याचा आरोपही केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुरुवारी लिंगायत पंचमसाली समाजाच्या अधिवेशनात बोलताना यत्नल यांनी दावा केला की, नवी दिल्लीतील काही लोक त्यांच्याकडे २५०० कोटी रुपये भरल्यास त्यांना मुख्यमंत्री करण्याची ऑफर घेऊन आले होते. ते म्हणाले, “त्यांनी मला विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याचे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या भेटींचे आश्वासन दिले होते.”

ते म्हणाले, “उमेदवारीचे आश्वासन देऊन राजकारणात अनेकांची फसवणूक होते. मी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी तसेच लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंह आणि अरुण जेटली यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. अशा व्यक्तीला मुख्यमंत्री होण्यासाठी २५०० कोटी रुपये तयार ठेवण्यास कोणी कसं सांगू शकतं?,” असाल सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच जे लोक ५० किंवा १०० कोटी द्यायला तयार होते, त्यांना मंत्री बनवलं जाणार असल्याचा आरोपही त्यांनी केला. शिवाय समाजातील लोकांनी अशा आश्वासनांना बळी पडून त्यांच्या राजकीय भवितव्याला धक्का लावू नये, अशा सल्ला त्यांनी दिला.

“निवडणुका जवळ आल्या की सर्व प्रकारचे उपक्रम समोर येतात. काही जण सामूहिक विवाह करतात किंवा विधानसभा निवडणूक लढवण्याच्या महत्त्वाकांक्षेने १५१ जोडप्यांचे लग्न लावून देतात. नोटबुक वाटप  आणि इतर उपक्रमही होताना दिसतात. ऑफर केलेल्या सर्व वस्तू स्वीकारा, परंतु जे तुम्हाला चांगले भविष्य देऊ शकतात, त्यांनाच मतदान करा,” असं यत्नल म्हणाले.

यत्नल यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, “येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री पदावरून खाली आणण्याचा मी संकल्प केला होता. येडियुरप्पा यांनी विचार केला की जर मी यत्नलला मंत्री केले तर माझ्या मुलाचे काय होईल? म्हणूनच त्यांनी माझं कोणतंही काम केलं नाही. मी त्यांना अनेक पत्रं पाठवली, पण त्यांनी दखल घेतली नाही. शेवटी त्यांना भेटण्यासाठी तिथे गेलो आणि त्यांना सांगितले की ही शेवटची वेळ आहे जेव्हा मी तुमच्या भेटीसाठी आलोय. या पुढे जोपर्यंत तुम्ही मुख्यमंत्री आहात तोपर्यंत मी तुमच्या चेंबरमध्ये किंवा कावेरी (मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान) येथे येणार नाही. तुम्हाला या पदावरून हटवल्यानंतरच मी इथे येईन,” असा इशारा आपण त्यांना दिल्याचा दावा त्यांनी केला.

या मुद्द्यावर कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार संताप व्यक्त करत म्हणाले, “यत्नल यांनी मुख्यमंत्री व्हायचे असेल तर २५०० कोटी रुपये द्यावे लागतील, मंत्री होण्यासाठी तुम्हाला १०० कोटी रुपये द्यावे लागतील. उपनिरीक्षक, मंडळ निरीक्षक, नियुक्त्या, सहाय्यक कर्मचारी, दूध (महासंघ), शिक्षक या सर्वांसाठी दर निश्चित करण्यात आले आहेत”, असा आरोपही त्यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka bjp mla basangouda patil yatnal alleges he was asked to pay rs 2500 crore to become cm hrc
First published on: 07-05-2022 at 14:51 IST