Movie Ticket Prices : चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणे बऱ्याच जणांना खर्चिक वाटू शकते, पण आता सिंगल स्क्रीन असो की मल्टीप्लेक्स, चित्रपट पाहण्यासाठी फक्त २०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. ग्राहकाने कोणतेही तिकीट खरेदी केले तरी त्याची किंमत २०० रुपयांपेक्षा जास्त असणार नाही. मात्र हा लाभ फक्त कर्नाटकमध्ये राहणाऱ्यांना मिळणार आहे. करण कर्नाटकमधील सिद्धरामय्या सरकारने शुक्रवारी (७ मार्च) यासंबंधीचा निर्णय घेतला आहे. सिद्धरामय्या यांनी राज्याच्या १६ व्या बजेटमध्ये कन्नड चित्रपटांबद्दलही मोठ्या घोषणा केल्या आहेत
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घोषणा केली की कर्नाटकमध्ये कन्नड चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी एक ओटीटी प्लॅटफॉर्म देखील स्थापन केला जाईल. रक्षित शेट्टी आणि ऋषभ शेट्टी अशा प्रमुख कन्नड अभिनेचे-प्रोड्यूसर्सनी तक्रार केली होती की प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्म कन्नड भाषेतील कंटेंट प्रदर्शित करण्यात रस दाखवत नाहीत. रक्षित शेट्टीच्या प्रोडक्शन हाऊस परमवाह स्टूडीओने ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध न झाल्याने जुलै २०२४ मध्ये एका कस्टम प्लॅटफॉर्मवर त्यांची वेब सीरीज एकमचे स्ट्रीमिंग केले होते.
कर्नाटक सरकारच्या कन्नड सिनेमासाठी मोठ्या घोषणा
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्याच्या सामाजिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मूल्य दाखवणाऱ्या चित्रपटांना सुरक्षित करण्यासाठी डिजिटल आणि नॉन-डिजिटल दोन्ही स्वरूपातील कन्नड चित्रपटांचा संग्रह तयार करण्यासाठी ३ कोटी रुपये देखील मंजूर केले आहेत. तसेच त्यांनी चित्रपट सृष्टीशी संबंधित लोकांच्या मागण्या लक्षात घेतल्यानंतर सिद्धरमय्या म्हणाले की, चित्रपट क्षेत्राला इंडस्ट्रीचा दर्जा दिला जाईल आणि याला इंडस्ट्रीयल पॉलिसी अंतर्गत दिल्या जाणाऱ्या इतर सुविधा देखील दिल्या जातील.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील नंदिनी आऊटलेटमध्ये कर्नाटक फिल्म अकॅडमीच्या मालकीच्या २.५ एकर जमिनीवर सार्वजनिक आणि खाजगी भागीदारीतून मल्टिप्लेक्स थियटर कॉम्प्लेक्स विकसीत केले जाईल. तसेच त्यांनी सांगितलं की, म्हैसूर येथे पीपीपी मॉडेल अंतर्गत ५०० कोटींच्या खर्चातून आंतरराष्ट्रीय दर्जाची फिल्म सिटी विकसीत करण्यासाठी १५० एकर जमीन देखील माहिती आणि जनसंपर्क विभागाला हस्तांतरित केली आहे.