कर्नाटकाचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना पुन्हा एकदा आपला कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले आहे. यापूर्वी त्यांनी 21 महिन्यांसाठी मुख्यमंत्रिपद भूषवले होते. परंतु यावेळी त्यांना केवळ 14 महिन्यांमध्ये मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले आहे. मंगळवारी कर्नाटक सरकार पडल्यानंतर कुमारस्वामी यांनी संध्याकाळी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. विश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान कुमारस्वामी यांनी आपण अॅक्सिडेंटल मुख्यमंत्री असून आपण केवळ नशीबाच्या जोरावर इथपर्यंत पोहोचलो असल्याचे सांगत खंत व्यक्त केली.

23 मे 2018 रोजी कुमारस्वामी यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतली होती. तर 23 जुलै रोजीच त्यांच सरकार कोसळलं. आज जी परिस्थिती कुमारस्वामी यांच्या बाबतीत उद्भवली आहे तिच परिस्थिती 2006 मध्ये खुद्द कुमारस्वामी यांच्यामुळे उद्भवली होती. त्यावेळी कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएस यांचे सरकार स्थापन करण्यात आले होते. तसेच काँग्रेसचे नेते धर्म सिंग यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रं होती. परंतु त्यावेळी कुमारस्वामी हे आपल्या 42 आमदारांसह वेगळे झाले आणि त्यांनी सरकार पाडले होते.

28 जानेवारी 2006 रोजी कर्नाटकाचे राज्यपाल टी.एन. चतुर्वेदी यांनी कुमारस्वामी यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिलं. त्यानंतर कुमारस्वामी यांनी भाजपाला सोबत घेऊन सरकार स्थापन केले होते. दरम्यान, दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी झालेल्या तडजोडीनुसार 3 ऑक्टोबर 2007 रोजी त्यांनी मुख्यमंत्रिपदावरून हटणे अपेक्षित होते. परंतु 4 ऑक्टोबर रोजी त्यांनी भाजपाकडे मुख्यमंत्रिपद देण्यास नकार दिला आणि 8 ऑक्टोबर रोजी त्यांनी राज्यपालांना आपला राजीनामा सोपवला. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले होते.

2018 मध्ये कर्नाटकात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला 104, काँग्रेसला 80 तर जेडीएसला 37 जागांवर विजय मिळाला होता. भाजपाला बहुमताच्या आकड्यापासून केवळ 9 जागा दूर होती. त्यानंतरही येडियुरप्पा यांनी 17 मे 2018 रोजी सरकार स्थापनेचा दावा केला आणि त्यानंतर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु ते बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरले आणि 19 मे रोजी त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर 23 मे 2018 रोजी कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. जेडीएस आणि काँग्रेसने केलेल्या आघाडीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते सिद्धरामय्या हे नाराज होते. तसेच काँग्रेसचे तत्कालिन अध्यक्ष राहुल गांधी यांना त्यांनी आघाडी न करण्याचीही विनंती केली होती.