पंतप्रधान नरेंद्र मोदींसंबंधी केलेल्या एका ट्वीटमुळे सध्या कर्नाटक काँग्रेसमध्ये खळबळ माजली आहे. काँग्रेसकडून करण्यात आलेल्या या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक केलं जात असून टीका होत आहे. दरम्यान काँग्रेसने ते ट्वीट डिलीट केली असून यामध्ये सहभागी असणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी शिवकुमार यांनी ट्वीट करत सोशल मीडिया टीमला हे ट्वीट डिलीट करण्यास सांगितलं.

“भीक मागण्यास मनाई असूनही…,” काँग्रेसची मोदींवर आक्षेपार्ह टीका; ‘अंगूठा छाप’ म्हटल्याने मोठा वाद

डी शिवकुमार यांनी ट्वीटरच्या माध्यमातून याप्रकरणी खेद व्यक्त केला. या ट्वीटमध्ये मोदींचा उल्लेख निरक्षर असा करण्यात आला होता.

डी शिवकुमार यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “राजकीय चर्चा करताना नेहमी नागरी आणि संसदीय भाषेचा वापर करण्यात आला पाहिजे यावर माझा विश्वास आहे”. तसंच सोशल मीडिया मॅनेजरने कर्नाटक काँग्रेसच्या ट्वीटर अकाऊंटवरुन केलेलं असंसदीय ट्वीट खेदजनक असून काढण्यात येत आहे असंही यावेळी त्यांनी सांगितलं आहे.

‘त्या’ ट्वीटमध्ये नेमकं काय म्हटलं होतं –

कर्नाटकमध्ये दोन पोटनिवडणुकांच्या निमित्ताने प्रचार सुरु असून यावेळी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेमुळे मोठा वाद निर्माण झाला. काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला करताना त्यांचा निरक्षर असा उल्लेख केला होता.

“काँग्रेसने शाळा बांधल्या पण मोदी कधी शिक्षण घेण्यासाठी गेले नाहीत. काँग्रेसने प्रौढांसाठी शिकण्यासाठी योजनाही उभारल्या, मोदी तिथेही शिकले नाहीत. भीक मागण्यास मनाई असूनही उपजीविकेसाठी भीक मागण्याची निवड करणारे लोक आज नागरिकांना भिकारी होण्याकडे ढकलत आहेत. ‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला भोगावं लागत आहे,” अशी टीका काँग्रेसने केली होती.

काँग्रेसची ही टीका मोदींवर वैयक्तिक टीका असल्याचं अनेकांनी म्हटलं. कर्नाटकमधील भाजपाचे प्रवक्ते मालविका अविनाश यांनी फक्त काँग्रेसच्या इतक्या खालच्या स्तराला जाऊ शकतं अशी टीका केली आहे. तसंच यावर प्रतिक्रिया दिली जावी इतकीही याची किंमत नसल्याचं म्हटलं.

काँग्रेस प्रवक्ता लावण्य बल्लाल यांनी हे ट्वीट दुर्दैवी असून याची चौकशी केली जाईल असं सांगितलं होतं. मात्र त्यांनी हे ट्वीट माघारी घेण्याचा किंवा माफी मागण्याचा प्रश्न नसल्याचंही सांगितलं होतं.

कर्नाटकात ३० ऑक्टोबरला दोन ठिकाणी पोटनिवडणुका होणार आहेत. जनता दल सेक्यूलर आणि भाजपा आमदाराच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या या जागांवर निवडणुका होत आहे.