कर्नाटकमध्ये जनता दल सेक्युलर (जेडीएस) आमदार एम श्रीनिवास यांनी एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांना कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. संगणक लॅबसाठी सुरु असलेल्या विकासकामाबाबत प्राचार्य स्पष्ट उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळे संतापलेल्या आमदार एम श्रीनिवास यांनी त्यांना कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्राचार्यांसोबत असे वर्तन केल्याबद्दल लोकांनी श्रीनिवासवर ताशेरे ओढले आहेत.
मोठ्या प्रमाणात टीका
आमदार श्रीनिवास यांनी महाविद्यालयाला भेट दिली असता महाविद्यालयाचे प्राचार्य नागानंद यांनी महाविद्यालयाच्या विकासकामांची योग्य माहिती आमदारांना दिली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांच्या वागण्याने नाराज झालेल्या आमदार एम श्रीनिवास यांनी मुख्याध्यापकांना जाहीर चपराक मारली. आमदारांनी अनेकवेळा प्राचार्यावर हात उगारला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. त्याचवेळी सोशल मीडियावर लोकांनी आमदार श्रीनिवास यांना सार्वजनिकरित्या प्राचार्यांवर हात उगारल्यामुळे आमदारांवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे.
आयुक्तांकडे तक्रार करणार
या घटनेबाबत मंड्या जिल्ह्याचे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शंभू गौडा यांनी मंगळवारी ही बाब जिल्हा आयुक्तांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे सांगितले. गौडा यांनी असोसिएशनची तातडीची बैठक बोलावली आहे. त्यांनी प्राचार्य नागानंद यांचीही भेट घेत त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.