Karnataka Elections 2023 : अभिनेता मकरंद अनासपुरे यांचा गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा या मराठी चित्रपट तुम्हाला आठवत असेलच. या चित्रपटात उमेदवारी अर्ज भरण्याकरता मकरंद अनासपुरे यांनी चिल्लर आणली होती. आता असाच प्रकार कर्नाटकात घडला आहे. कर्नाटकात निवडणुकांची धामधूम सुरू आहे. विविध पक्षांच्या उमेदवारी याद्या जाहीर झाल्या असून उमेदवारी अर्ज भरण्याचीही प्रक्रिया होत आहे. यातच, एका यादगीर मतदारसंघातून अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज भरला आहे. परंतु, त्याने हटकेपद्धतीने हा उमेदवारी अर्ज भरला असून त्याने चक्क एक एक रुपयांची चिल्लर जमा केली आहे.

“मी माझं आयुष्य माझ्या समाज आणि गावासाठी समर्पित करतोय. स्वामी विवेकानंदा यांचे विचार असलेले एक फलक घेऊन मी आज अर्ज भरण्यासाठी येथे आलो आहे”, असं अपक्ष उमेदवार यांकप्पा यांनी म्हटलं. यांकप्पा यांनी लोकवर्गणीतून १० हजार रुपये गोळा केले आहेत. एक-एक रुपयांचे नाणे जमा करून त्यांना १० हजारांचा निधी गोळा केला. हेच १० हजार रुपये त्यांनी आज कार्यालयात दिले.

दरम्यान, १० मे रोजी कर्नाटकात विधानसभेसाठी मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. याचा निकाल १३ मे रोजी जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी कर्नाटकातील सर्वपक्षीयांनी मेहनत घेतली आहे. निवडणुका जाहीर झाल्यापासूनच भाजपाला पक्षफुटीचे ग्रहण लागले आहे. उमेदवार याद्या जाहीर झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर आणि माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी पक्षाला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

खासदारकी रद्द झाल्याने काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधींनीही सर्वस्व पणाला लावले आहे. त्यांनी येथे झंझावाती प्रचार सुरू केला असून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आव्हान दिले आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदीही लवकरच कर्नाटकात जाऊन भाजपाच्या वतीने प्रचार करणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रचारासाठी जाणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे.