काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सैफुद्दिन सोझ यांनी शनिवारी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अण्वस्त्र युद्ध होत नाही तो पर्यंत पाकव्याप्त काश्मीरचा भाग भारताला मिळणार नाही असे सोझ यांनी म्हटले आहे. शुक्रवारी सैफुद्दिन सोझ यांनी काश्मिरींना पाकिस्तानमध्ये समाविष्ट होण्याऐवजी स्वतंत्र व्हायला आवडेल हे परवेझ मुशर्रफ यांचं विधान योग्य असल्याचे म्हटले होते. त्यावरुन भाजपाने काँग्रेसवर जोरदार टीका केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशाबाहेर एक पाकिस्तान आहे आणि काँग्रेसमध्येही एक पाकिस्तान आहे अशी टिका भाजपाने केली होती. काँग्रेसचे दुसरे नेते राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी काश्मीरमध्ये लष्कराच्या कारवाईत दहशतवाद्यांपेक्षा सर्वसामान्य नागरिक जास्त मारेल जातात असे विधान केले होते. सध्या पाकिस्तानच्या ताब्यात काश्मीरचा जो भाग आहे तो भारताचाच भूभाग असल्याची भारताची सुरुवातीपासून भूमिका राहिली आहे.

सोझ यांच्या वक्तव्याचा संबित पात्रा, अमित मालवीय व रवि शंकर या नेत्यांनी लागलीच समाचार घेतला. “दहशतवादी संस्था लष्कर ए तय्यबा काँग्रेसचे नेते गुलाब नबी आझाद यांच्या मताशी सहमती दर्शवते तर दुसरे काँग्रेसचे नेते सोझ म्हणतात की काश्मिरींना स्वतंत्र व्हायचंय. याचा अर्थ भारताबाहेर एक पाकिस्तान आहे आणि काँग्रेसमध्ये एक पाकिस्तान आहे,” संबित पात्रा यांनी ट्विट केलंय. ज्यांना देशाचे तुकडे करायचेत त्यांना काँग्रेसची साथ असल्याचा आरोप रवि शंकर प्रसाद यांनी केला. विशेष म्हणजे सैफुद्दिन सोझ हे युपीए सरकारमध्ये केंद्रात मंत्री होते. सोझ यांचे काश्मीर ग्लिम्पसेस ऑफ हिस्टरी अँड स्टोरी ऑफ स्ट्रगल हे पुस्तक पुढील आठवड्यात प्रकाशित होत आहे. त्यामध्येही अशा प्रकारची मांडणी असण्याची शक्यता आहे.

सोझ यांना 2008 मध्ये जम्मू काश्मीर प्रदेश कमिटीच्या अध्यक्षपदी नेमण्यात आले होते. मूळचे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते असलेले सोझ 1999 मध्ये काँग्रेसमध्ये आले. हुरियत कॉन्फरन्सच्या फुटीरतावादी नेत्यांनी चर्चेसंदर्भात मांडलेल्या भूमिका मुख्य राजकीय पक्षांनी समजून घ्यायला हव्या असे मतही सोझ यांनी नुकतेच व्यक्त केले होते. गेल्या वर्षी बुऱ्हान वाणी या दहशतवाद्याचा सुरक्षा जवानांनी खात्मा केला होता. माझ्या हातात परिस्थिती असती तर मी बुऱ्हान वाणीला चर्चा करण्यासाठी जिवंत ठेवलं असतं असंही सोझ म्हणाले होते. अशी पार्श्वभूमी असलेल्या सोझ यांच्या ताज्या वक्तव्याचा भाजपाच्या नेत्यांनी कडक शब्दांमध्ये समाचार घेतला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kashmir congress leader saifuddin soz pok nuclear war
First published on: 23-06-2018 at 14:42 IST