Kedarnath Dham Yatra 2025 : पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर व आसपासच्या राज्यांमध्ये निर्माण झालेली दहशत जुगारून हजारो भाविक केदारनाथमध्ये दाखल झाले आहेत. आजपासून केदारनाथ यात्रेला सुरुवात झाली असून सकाळी सात वाजता मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आले. बाबा भोलेनाथांच्या दर्शनासाठी देशभरातील हजारो भाविक केदारनाथमध्ये दाखल झाले आहेत. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षेत केदारनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे. दहशतीच्या सावटातही भाविकांनी केदारनाथमध्ये दाखल होऊन दहशतवादाला चपराक लगावली आहे.

उत्तराखंडमधील केदारधामचे दरवाजे आज (२ मे) सकाळी उघडण्यात आले. केदारनाथमध्ये हिवळ्यात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते. मंदिर व आसपास बर्फ साठलेला असतो. त्यामुळे हिवाळ्याचे काही महिने ही यात्रा बंद असते. त्यानंतर अक्षय्य तृतीयेच्या आसपास हे मंदिर भाविकांसाठी खुलं केलं जातं. दरम्यान, आज अक्षय्य तृतीयेनंतर दोन दिवसांनी मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. आता नोव्हेंबरपर्यंत हे मंदिर भाविकांसाठी खुलं असेल.

कडेकोट सुरक्षेत मंदिर भाविकांसाठी खुलं

अनेक भाविक उत्तराखंडमधील छोटी चारधाम यात्रा करत असतात. भाविक केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री व यमुनोत्री अशी छोटी चारधाम यात्रा केली जाते. केदारनाथमधील बाबा भोलेनाथांच्या दर्शनापासून ही यात्रा सुरू होते. दरम्यान, मोठ्या संख्येने भाविक या चारधाम यात्रेसाठी केदारनाथमध्ये दाखल झाले आहेत. आज पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान, या यात्रेसाठी कडेकोट सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

गुरुवारी पालखी सोहळा संपन्न

बाबा भोलेनाथांची पंचमुख चलविग्रह उत्सव पालखी गुरुवारी दुपारी केदारनाथमध्ये दाखल झाली होती. भोलेनाथांच्या दर्शनासाठी १५ हजार भाविक केदारनाथमध्ये दाखल झाले होते. यासाठी गुरुवारी मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषात केदारधाम दुमदुमून गेलं. यानिमित्त केदारनाथ मंदिर १०८ क्विंटल फुलांनी सजवण्यात आलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरक्षेसाठी प्रशासनाकडून भाविकांसाठी मार्गदर्शक सूचना

दरम्यान, केंदारनाथ यात्रेकरूंसाठी पोलिसांनी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मंदिराच्या ३० मीटर परिघात मोबाइल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. मंदिर परिसरात रील शूट करताना, फोटो काढताना कोणी आढळल्यास मोबाइल जप्त केले जातील, तसेच ५,००० रुपयांचा दड वसूल केला जाईल, असंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.