केप्लर दुर्बिणीची आतापर्यंत सर्वात मोठी कामगिरी
नासाच्या केप्लर दुर्बिणीने आतापर्यंतच्या सर्वात मोठय़ा कामगिरीत सौरमालेबाहेर १२८४ नवीन बाह्य़ग्रह शोधून काढले आहेत. केप्लर दुर्बिणीने आतापर्यंत शोधलेल्या बाह्य़ग्रहांची संख्या त्यामुळे आधीच्या संख्येपेक्षा दुपटीहून अधिक झाली आहे. नव्याने शोधण्यात आलेल्या बाह्य़ग्रहांपैकी नऊ वसाहतयोग्य असण्याची शक्यता आहे, असे नासाने म्हटले आहे. नासाच्या वॉशिंग्टनमधील मुख्यालयात मुख्य वैज्ञानिक एलेन स्टोफन यांनी सांगितले की, या बाह्य़ग्रहांच्या शोधामुळे आपल्या सौरमालेबाहेर सूर्यासारख्या अनेक ताऱ्यांभोवती पृथ्वीसारखे ग्रह फिरत असल्याची शक्यता आणखी वाढली आहे. केप्लर दुर्बिणीने आतापर्यंत शोधलेल्या व निश्चित केलेल्या ग्रहांच्या संख्येपेक्षा ही संख्या दुप्पट आहे. जुलै २०१५ पर्यंत या दुर्बिणीने एकूण ४३०२ ग्रह शोधले, पण त्यांची निश्चिती झालेली नव्हती. आता शोधण्यात आलेले १२८४ ग्रह हे ९९ टक्के ग्रहच असण्याची शक्यता आहे. ग्रहासाठी आवश्यक असलेल्या अटी ते पूर्ण करतील अशी खात्री आहे. यापूर्वी १३२७ संभाव्य ग्रह शोधले गेले असून ते मात्र ग्रहाच्या व्याख्येत बसतात की नाही यासाठी अधिक अभ्यास करावा लागणार आहे. यातील उर्वरित ७०७ पदार्थ हे ग्रह म्हणावे की नाही या स्वरूपाचे आहेत. आधी वापरलेल्या तंत्राच्या आधारे इतर ९८४ पदार्थ मात्र ग्रह असण्याची शक्यता आहे. केप्लर दुर्बीण सोडण्यापूर्वी आपल्याला बाह्य़ग्रहांची काही माहिती नव्हती पण आता बाह्य़ग्रह सापडत आहेत व ताऱ्यांपेक्षा जास्त ग्रह सापडत आहेत, असे नासाच्या खगोलभौतिकी विभागाचे वैज्ञानिक पॉल हर्टझ यांनी सांगितले. या ज्ञानातून आपल्याला आगामी मोहिमांत मदत होऊ शकते व विश्वात दुसरीकडे जीवसृष्टी सापडू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. केप्लर दुर्बीण ही दूरस्थ ग्रहांकडून आलेले संदेश टिपत असते. जेव्हा हे ग्रह मातृताऱ्याच्या समोरून जातात तेव्हा त्यांची प्रकाशमानता कमी होते म्हणजेच अधिक्रमणाच्या माध्यमातून हे ग्रह सैद्धांतिक पातळीवर शोधले जात असतात. पहिला बाह्य़ग्रह वीस वर्षांपूर्वी शोधला गेल्यानंतर संशोधकांनी ग्रहाच्या व्याख्येत बसणारे अनेक खगोलीय घटक शोधले आहेत. आताच्या संशोधनात जी पद्धती वापरली आहे ती ग्रहपदास योग्य खगोलीय घटकांसाठी एकाचवेळी वापरली जाऊ शकते. नवीन ग्रहांमध्ये किमान ५५० ग्रह तरी त्यांच्या आकाराचा विचार करता पृथ्वीसारखे खडकाळ असू शकतात. त्यातील नऊ ग्रह हे वसाहत योग्य गुणधर्मात बसणारे आहेत, म्हणजे ते मातृताऱ्यापासून विशिष्ट अंतरावर असल्याने तेथे पाणी द्रवरूपात राहू शकते. त्यामुळे आता वसाहतयोग्यता गुणधर्म असलेल्या ग्रहांची एकूण संख्या २१ झाली आहे. केप्लर मोहिमेच्या वैज्ञानिक नताली बाटला यांनी सांगितले की, पृथ्वीसारखे ग्रह शोधण्यासाठी केप्लर दुर्बिणीचा वापर होत आहे. वसाहतयोग्य ग्रहांचा शोध घेऊन तेथे मोहिमा आखता येतील. आतापर्यंत ५ हजार ग्रहसदृश खगोलीय घटक शोधले गेले असून त्यातील ३२०० ग्रह असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यातील २३२५ केप्लर दुर्बिणीने शोधलेले आहेत.