देशात करोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे एका नव्या रोगाने भारतात शिरकाव केला आहे. नोरोव्हायरस (Norovirus) असे या व्हायरसचे नाव आहे. केरळमधील दोन मुलांना याची लागण झाल्याचे समोर आले आहे. मात्र, या मुलांची प्रकृती स्थिर असून कोणतीही काळजी करण्याची गरज नसल्याचे केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले आहे.

काय आहेत लक्षणे?
नोरोव्हायरस हा संसर्गजन्य रोग आहे. दुषित पाणी, अन्न किंवा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातून हा रोग पसरतो. केरळच्या तिरुवनंतपुरमच्या विहिंजममध्ये दोन मुलांना या रोगाची लागण झाली आहे. नोरोव्हायरसच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये उलट्या किंवा अतिसारचा त्रास होऊ शकतो. पोटदुखी, ताप, अंगदुखी, मळमळण्यासारखे वाटण्याचाही त्रास होऊ शकतो. या रोगाचे संसर्ग झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी ही लक्षणे दिसू लागतात. या रोगाचे अनेक प्रकार आहेत.

काळजी कशी घ्यावी?
नोरोव्हायरस हा करोनासारखा जीवघेणा रोग नाही. परंतु काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. लहान मुले तसेच वृद्धांची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. बहुतेक रुग्ण या रोगातून बरे होतात. मात्र, कधी कधी रुग्णाची परिस्थिती गंभीरही बनू शकते. त्यामुळे आजूबाजूला स्वच्छता राखणे, वारंवार साबणाने हात धुणे, तसेच जेवणाअगोदर आणि जेवणानंतर हात स्वच्छ धुणे, एकमेंकासोबत अंतर ठेऊन बोलणे यासारख्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.