सातपैकी सहा जणांच्या रक्ताच्या चाचण्या नकारात्मक
येथील निपाहची लागण झालेल्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात असलेल्या परिचारिका आणि परिचारक यांच्यासह सहा जणांच्या रक्ताच्या चाचणीमध्ये निपाह विषाणू नसल्याचे आढळले आहे, असे केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी सांगितले. यामुळे मोठा दिलासा मिळाल्याचेही आरोग्यमंत्री म्हणाल्या.
निपाहबाधित विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर असून त्याच्या संपर्कात आलेल्या ३१४ लोकांवर डॉक्टरांची टीम नजर ठेवून असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यातील सात जणांवर सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात स्वतंत्र कक्षामध्ये उपचार सुरू आहेत. विद्यार्थ्यांच्या संपर्कात असणाऱ्या परिचारिका, परिचारक अशा सहा जणांच्या रक्ताचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरालॉजी येथे तपासण्यात आले. त्यातील एकाच्या रक्त चाचणीचा अहवाल अद्याप आलेला नाही. मात्र उर्वरित सहा जणांच्या रक्तात निपाहचे विषाणू नसल्याचे आढळून आले आहे. याचाच अर्थ विषाणू पसरलेला नाही. हे दिलासा देणारे आहे, असे शैलजा यांनी सांगितले. दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी बुधवारी केरळमधील परिस्थितीचा आढावा घेऊन तेथील परिस्थिती नियंत्रणात असून लोकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केले.
निपाहची लक्षणे आणि परिणाम
निपाह हा दुर्मीळ रोग असून डुक्कर आणि वटवाघूळ यांच्यामुळे त्याचा फैलाव होतो. तसेच निपाहबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीमुळे आणि दूषित अन्नामुळे त्याची लागण होऊ शकते. याची लागण झालेल्या व्यक्तीला सुरुवातीला ताप येणे, डोकेदुखी, स्नायूंमध्ये वेदना, उलटय़ा आणि घसा दुखणे अशी लक्षणे दिसून येतात. त्यानंतर चक्कर येणे, अतिथकवा, मेंदूला सूज, शुद्ध हरपणे अशी लक्षणे दिसतात, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. या रोगावर सध्या थेट परिणाम करेल असे औषध नाही. त्यामुळे खबरदारी हाच उपाय आहे. निपाहचा फैलाव झालेल्या ठिकाणी प्रवास टाळवा. तसेच प्राण्यांच्या मार्फत याचा फैलाव होत असल्याने घोडे, कुत्रा, मांजर, शेळ्या-मेंढय़ा यांचा संपर्क टाळावा असेही डब्ल्यूएचओने सांगितले आहे.
उपचार नाकारणाऱ्या ३ रुग्णालयांवर गुन्हा
कोट्टायम : ६२ वर्षीय वृद्धाला उपचार नाकारणाऱ्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयासह ३ रुग्णालयांवर गुरुवारी गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या वृद्धाला उपचार नाकारल्यानंतर काही तासांतच त्यांचा मृत्यू झाला.
निपाहच्या फैलावाबाबत गंभीर असलेल्या सरकारने याची तातडीने दखल घेऊन उपचार नाकारणाऱ्या ३ रुग्णालयांवर भादंविच्या कलम ३०४ अनुसार गुन्हा दाखल केला आहे. कोट्टायमचे पोलीस याचा तपास करत आहेत. सरकारने वैद्यकीय शिक्षण संचालकांना याची चौकशी करून अहवाल देण्यास सांगितले आहे.
केरळमधील इडुक्की जिल्ह्य़ातील जेकब थॉमस यांना बुधवारी दुपारी गंभीर स्थितीमध्ये कोट्टायम येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यासाठी कोट्टाप्पना येथून आणण्यात आले होते. मात्र सरकारी रुग्णालयातील सर्व व्हेंटिलेटर्स उपयोगात असल्याचे सांगत थॉमस यांना दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी अन्य दोन खासगी रुग्णालयातही उपचारासाठी प्रयत्न केले. मात्र तेथेदेखील दाखल न केल्याने उपचार मिळू शकले नाहीत. त्यानंतर काही तासांतच थॉमस यांचा मृत्यू झाला. या मृत्यूला उपचार नाकारणारी तीन रुग्णालयेच जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला.
थॉमस यांना दोन दिवसांपूर्वी इडुक्की जिल्ह्य़ातील कोट्टाप्पना येथील रुग्णालयात ताप आणि श्वसनास त्रास होत असल्याच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आले होते.